मुंबई - परळ येथील बेस्ट कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या एका वाहकाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. या वाहकाच्या जावयाला कोरोना झाल्यानंतर त्यांची मुलगी आणि नातही बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या वसाहतीतील एक इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे. तसेच तेथे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या वसाहतीमध्ये ६० कुटुंब राहत असल्याने त्यांच्यापैकी काहींना तातडीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या वडाळा बस आगारातील विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला गेल्या आठवड्यात कोरोना झाल्याचे उजेडात आले. त्यांनतर आता परळ येथील कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या वाहकाची मुलगी आणि नात कोरोना बाधित असल्याचे मंगळवारी समोर आले. त्यामुळे वाहकाच्या कुटुंबाचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे कळताच पालिकेने त्या वसाहतीतील इमारत सिल केली आहे. कोरोनाची लागण आणखी कोणाला होऊ नये, यासाठी या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
त्याचबरोबर त्यांच्या शेजारी राहणारे काही कुटुंब व सदर वाहकाच्या सहकाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व संशयितांची चाचणी करून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत या वसाहती मध्ये नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. येथील रहिवाशांच्या दैनंदिन गरजा सशुल्क पद्धतीने महापालिकेमार्फत भागवण्यात येणार आहेत.
असा झाला कोरोनाचा प्रसार...
दोन दिवसांपूर्वी लालबाग येथे एका तरुणाला करोना झाल्याचे उघडकीस आले होते. त्याची पत्नी आपल्या मुलीला घेऊन बेस्ट कामगार वसाहतीत राहायला आली होती. तिला आणि मुलीला देखील करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करणाऱ्याच्या कुटूंबात हा प्रकार घडल्यामुळे त्या वाहकाच्या सोबतच्या चालकाला घरातच वेगळे ठेवण्यात आले आहे.