मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना मुंबईतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भाटिया रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत माहिती दिल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे की, आमच्या रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांवर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु केले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे असं त्यांनी सांगितले.
मात्र २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने यांच्या संपर्कात असणाऱ्यांपैकी ज्यांना जास्त धोका असण्याची शक्यता आहे अशांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे तर कमी धोका असणाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचसोबत उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
तसेच जे रुग्ण बरे होण्याच्या स्थितीत आहेत अशांना गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांच्या सुरक्षेसाठी त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे. शुक्रवारी जवळपास हॉस्पिटलमधील १५० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ११० कर्मचाऱ्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर ११ जणांना कोविड १९ ची लागण झाल्याचं समोर आलं आहे अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.