CoronaVirus: दादरमधल्या पोर्तुगीज चर्चजवळील महिला कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:26 PM2020-04-06T17:26:07+5:302020-04-06T17:27:01+5:30
विशेष म्हणजे या रुग्णांनी परदेशात प्रवास केल्याची अथवा कोणाच्या संपर्कात आल्याची नोंद अद्याप सापडलेली नाही.
मुंबई - दादर पश्चिम, पोर्तुगीज चर्च शेजारील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका 54 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी शिवाजी पार्क येथील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दादर पश्चिममध्ये आता दुसरा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णांनी परदेशात प्रवास केल्याची अथवा कोणाच्या संपर्कात आल्याची नोंद अद्याप सापडलेली नाही.
दादर पश्चिम येथील पुरातन पोर्तुगीज चर्चशेजारील इमारतीमध्ये राहणाऱ्या महिलेमध्ये काही लक्षणे आढळून आल्यानंतर तिने खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली होती. या चाचणीत तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिसरातील दोन इमारती सिल करण्यात आल्या आहेत. तसेच या महिलेच्या संपर्कातील पाच नातलगांना हाय रिस्क ठरवून त्यांची चाचणी करण्यात येत आहे.
सदर महिलेला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इमारतीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच या इमारतीमध्ये राहणाऱ्या अन्य रहिवाशांचीही चाचणी केली जाणार आहे. तोपर्यंत त्यांना इमारती बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हाय रिस्क गटातील व्यक्तींच्या चाचणीचे नमुने निगेटिव्ह येईपर्यंत या इमारतीमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पालिकेमार्फत जीवन आवश्यक वस्तू पुरविण्यात येणार आहेत.