मुंबई : हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी आणि वरळीत तुलनेने परिस्थिती सुधारत असताना उत्तर मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर येथे दररोज अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आहे. परिणामी आता येथील कोरोनाचा बीमोड करण्यासाठी धारावी मॉड्युल कामी येणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाºया धारावीमध्ये कोरोना विषाणूविरोधात सामना करताना आलेल्या अनुभवांचा फायदा करून त्याच धर्तीवर मुंबई महापालिका उपनगरांमध्ये कोरोनाला मारण्यासाठी काम करत आहे.
वरळी आणि धारावीत संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या रणनीतीच्या धर्तीवर शीघ्र कृती आराखडा तयार करण्यात आला. याचा एक भाग म्हणून प्रादुर्भाव जास्त असणाºया भागात ५० रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून तापाचे निदान करण्यासाठी फिरते दवाखाने तैनात केले. हे फिरते दवाखाने डॉक्टरांच्या पथकासह दिवसभर घरोघरी जाऊन रहिवाशांची ताप आणि इतर लक्षणे याबाबत तपासणी करतात. गंभीर रुग्ण तपासतात आणि एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तिच्या घशातील स्रावाचे नमुने गोळा करतात. विस्तृत स्क्रीनिंगच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणात किमान १० हजार घरांचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. अशा रीतीने आठवड्यात २५ लाख लोकांचे स्क्रीनिंग होणार आहे.
मुंबईकरांना दिलासामुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने चाळिशी ओलांडली आहे. २४ जूनच्या आकडेवारीनुसार हा कालावधी तब्बल ४१ दिवसांवर पोहोचला आहे. हाच कालावधी १६ जून रोजी ३० दिवस एवढा होता. तर याच वेळी रुग्णसंख्येत होणाºया दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी हीदेखील दिवसेंदिवस कमी होत असून, १७ जून रोजी २.३० टक्के असणारी ही टक्केवारी आता १.७२ टक्क्यांवर आली आहे.मुंबई महापालिका काय म्हणते?मुंबईत ११ मार्च रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्गजन्यताही तुलनेने अधिक असणाºया या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणाºया मुंबईत मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैद्यकीय उपचारविषयक आवश्यक ती कार्यवाहीदेखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी कोरोना संसर्गास परिणामकारकरीत्या आळा घालणे शक्य होत आहे.विविध नागरी समाज संघटनांसह सार्वजनिक, खासगी भागीदारी वाढवण्याचे धारावी मॉडेल उपनगरामध्येही राबविण्यात येत आहे. यासाठी स्थानिक डॉक्टर, क्रेडाई-एमएचआय, भारतीय जैन संघटना, देश अपनाये फाउंडेशन यांच्याशी करार झाला आहे. मुंबई व पुण्यातील लोकांची तपासणी करण्यासाठी १ लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किटदेखील खरेदी केले जात आहेत. मुंबईत दररोज चाचणीचे प्रमाण सध्याच्या ४ हजार ते ४ हजार ५०० सरासरीपेक्षा ६ हजारपर्यंत जाईल.