Coronavirus: मुंबईतून कोरोना संपला? नव्या लाटेची शक्यता किती, समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:38 PM2022-05-16T19:38:50+5:302022-05-16T19:39:25+5:30
Coronavirus in Mumbai: कोरोनाकाळात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात सापडले होते. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. दरम्यान, आता परिस्थितीत मोठा बदल झाला असून, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण अगदी कमी झाले आहेत.
मुंबई - कोरोनाकाळात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात सापडले होते. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. दरम्यान, आता परिस्थितीत मोठा बदल झाला असून, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण अगदी कमी झाले आहेत. मुंबईत दररोज १०० हून अधिक रुग्ण सापडत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अगदीच कमी आहे.
दरम्यान, बीएमसीने अजून एक आकडा प्रसिद्ध करत मुंबईमध्ये कोरोनाचे गंभीर रुग्ण जवळपास नसल्याचा दावा केला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये कोरोनाचा एकही गंभीर रुग्ण नाही आहे. सध्या मुंबईमध्ये केवळ २६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ७२ रुग्णालयातील १९ हजार बेर रिकामे आहेत. अशा परिस्थितीत परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.
कोरोनाचे रुग्ण थोडे अधिक सापडत आहेत. संसर्गाचा दरही अधिक आहे. मात्र तरीही चिंतेची कुठलीही बाब नाही आहे. यासाठी बीएमसीने आयआयटी कानपूरच्या एका रिपोर्टचा हवाला दिला आहे. त्यानुसार जुलै महिन्यामध्ये मुंबईत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. तर त्याचा उच्चांक हा सप्टेंबर महिन्यात येऊ शकतो.
आयआयटी कानपूरचे आधीचे रिपोर्ट खरे ठरलेले असल्याने बीएमसी या रिपोर्टकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ९ जम्बो कोविड सेंटर सुरू ठेवण्यात येणार आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी ते बंद केले जाणार नाहीत.