मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.19 मार्चला त्या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. देशातील हा कोरोनानं दगावलेला पाचवा बळी आहे. राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्याही 74 झाली असून, दिवसभरात 10 रुग्णांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी राज्यात कोरोनाचे पुण्यात 2, मुंबईत 8, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी 1 असे 12 नवीन रुग्ण शनिवारी आढळले होते. त्यामुळ राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली होती. त्यानंतर आता आणखी नव्या 10 रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा 74वर गेला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 74 झाली असून, मुंबई 27, पिंपरी चिंचवड 12, पुणे 15, नागपूर 4, यवतमाळ 3, कल्याण 3, नवी मुंबई 3, रायगड 1, ठाणे + उल्हासनगर 2, अहमदनगर 2, औरंगाबाद 1, रत्नागिरी 1, अशी रुग्णांची नोंद झाली आहे.
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.