Coronavirus: चिंताजनक! कोरोना वेगाने पसरतोय; मुंबईत १ हजार ७५६ कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 09:39 PM2020-04-14T21:39:01+5:302020-04-14T21:40:20+5:30
सोमवारी २०४ रुग्णांचे निदान, ११ मृत्यूंची नोंद, एकूण बळी ११२
मुंबई – राज्यात अडीच हजारांहून अधिक कोरोना (कोविड-१९) रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १७५६ कोरोना रुग्ण असून मंगळवारी २०४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर शहर उपनगरात मंगळवारी ११ मृत्यूंची नोंद झाली त्यामुळे मृतांचा आकडाही ११२ वर पोहोचला आहे. शहरातील वाढते संसर्गाचे संक्रमण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नवे मार्ग अवलंबिले जात आहे.
मुंबईत ५ ते १३ एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोरोना (कोविड-१९) रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ९० क्लिनिक्समध्ये ३ हजार ५१८ लाभार्थींचे सर्वेक्षण कऱण्यात आले आहे. त्यापैकी १ हजार ३८४ संशयितांचे नमुने घेण्यात आले. मुंबईतील एकूण कोरोना (कोविड-१९) रुग्णांपैकी ७८१ कोरोना रुग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि सर्वेक्षण अंतर्गत कोविड संशयित रुग्णांचा शोध या अंतर्गत सापडले आहेत. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात सोमवारी तीन कोरोना (कोविड-१९) रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात ४२ वर्षीय महिलेसह तिची ६९ वर्षीय आई आणि १५ वर्षीय मुलाने संसर्गावर मात केली आहे आणि ते पूर्णपणे बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने त्यांना घरगुती अलगीकरणाबाबत समुपदेशन केले आहे.
कूपर रुग्णालयात रुग्णाची परिचारिकेला मारहाण
कूपर रुग्णालयात उपचारांसी दाखल झालेल्या गर्भवती रुग्णाने डिस्चार्ज नाकारल्यामुळे संतप्त होऊन परिचारिकेला मारहाण केली आहे. यावेळी, मारहाण करण्यापासून गर्भवतीचा पतीही रोखत होता, मात्र रुग्ण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. याविषयी, बुधवारी रितसर तक्रार नोंदविण्यात येईल असेही रुग्णलाय प्रशासनाने सांगितले.
टीबी रुग्णालयातील कर्मचारी क्वारंटाइन
शहरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने आता टीबी रुग्णालयातही शिरकाव केला आहे. या रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांना घरगुती अलगीकऱण ( होम क्वारंटाइन ) सांगितले आहे. यात दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि दोन वाॅर्डबाॅयचा समावेश आहे. मुंब्रा येथील कोरोना रुग्णाला ३ एप्रिल रोजी शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात आणले होते. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन कऱण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना अलगीकऱण सांगितले आहे.
११ मृत्यूंची नोंद, बळींचा आकडा ११२ वर
शहर उपनगरात मंगळवारी ११ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यापैकी एक मृत्यू मंगळवारी झाला असून अन्य पाच मृत्यू सोमवारी, तीन मृत्यू १२ एप्रिल, दोन मृत्यू ९ एप्रिल रोजी झाले आहेत. या अकरा मृत्यूंपैकी नऊ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते, तर दोन मृत्यू वार्धक्यामुळे झाले आहेत. दीर्घकालीन आजारांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, स्थूलता, हृदयविकार, अस्थमा यांसारखे आजार आहेत. तर एका रुग्णाला क्षयरोगही होता. अकरा मृत रुग्णांमध्ये आठ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. यातील सायन, वांद्रे भाभा, कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात प्रत्येकी दोन रुग्णांचा तर ग्लोबल, राजावाडी , केईएम रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी भरती झालेले संशयित रुग्ण ३८५
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ५११८
मंगळवारी निदान झालेले रुग्ण २०४
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण १७५६
मंगळवारी झालेल्या मृत रुग्णांची नोंद ११
एकूण मृतांची संख्या ११२
मंगळवारी कोविडमधून मुक्त झालेले रुग्ण २३
कोविड आजारातून मुक्त झालेले रुग्ण १६४