Coronavirus: मुंबईची जीवनवाहिनी कोरोनाने थांबविली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:47 PM2020-03-22T15:47:29+5:302020-03-22T15:54:53+5:30
देशभरातील रेल्वे सेवा 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली आहे.
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिनेमागृह, जिम, जलतरण, हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता कोरोना विषाणूमुळे मुंबईची जीवनवाहिनी बंद करण्यात आली आहे. यासह देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकता मेट्रो बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील रेल्वे सेवा 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली आहे. ही सेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा रेल्वे मंडळाने निर्णय घेतला आहे. मध्य, पश्चिम, हाबर मार्गवर एकही लोकल आणि कोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस धावणार नसल्याचे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांमध्ये होम क्वारंटाईनचे स्टॅम्प असलेले प्रवासी हे रेल्वेने प्रवास करत होते. त्यामुळे इतर प्रवाशांच्या तक्रारीने या प्रवाशांना एक्सप्रेसमधून उतरविण्यात आले. होम क्वारंटाईनचे स्टॅम्प असलेल्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशानांही याची लागण होण्याच्या भीतीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वेला ४०० कोटी रूपयांचे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे.
कम्युनिटी ट्रान्समिशनचा तिसरा टप्पाच्या धोका लक्षात घेऊन रेल्वे मंडळाकडून हा निर्णय घेतला आहे. 22 मार्च रोजी अत्यावश्यक सेवेसाठी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय उपचार घेणाऱ्या नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू होती. मात्र एक्सप्रेसमधून कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने रेल्वेने हा निर्णय़ घेतला आहे.
मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्यांच्या एसी डब्यातील चादरी, उश्याची कव्हर प्रत्येक फेरीला धुतली जात नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चादरी आणि उशा न घेण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली होती. कोरोना विषाणू पसरू नये, यासाठी खबरदारी म्हणून असा निर्णय घेतला होता. भारतीय रेल्वेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आरक्षणाअंतर्गत सीट्स, दरवाजे, रेलिंग यासारख्या सॅनिटाईज करण्यात येत होत्या. तसेच रेल्वे स्थानकांची स्वच्छताही करण्यात येत होती. मात्र होम क्वारंटाईन प्रवाशांमुळे आणि कोरोना संशयित प्रवाशांमुळे रेल्वे, लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
22 मार्चच्या मध्यरात्रीपासून ते 31 मार्च 2020 दरम्यान रद्द होणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा परतावा 100 टक्के परतावा देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने जाहीर केले आहे.