coronavirus: कोरोना चाचणीसाठी आता प्रिस्क्रिप्शनची गरज नाही; मुंबई महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:50 AM2020-07-07T06:50:11+5:302020-07-07T06:50:42+5:30
कोरोनाबाधित रुग्णांचा शोध तत्काळ लागावा, यासाठी हा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेण्याची अट मुंबई महापालिकेने काढून टाकली आहे. यापुढे संशयित रुग्णांना कोणत्याही
वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी करून घेता येणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध तत्काळ लागावा, यासाठी हा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्या वेळी महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांची चाचणी केली जात होती. रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर पालिकेने अन्य उपनगरीय रुग्णालयांमध्ये व त्यानंतर खासगी प्रयोगशाळांना चाचणीची परवानगी दिली. मात्र डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच चाचणी करण्यात येईल, अशी अट घालण्यात आली होती.
अनेक उपायांनंतर हे पाऊल
रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे उभे राहिले. अशा वेळी ई-प्रिस्क्रिप्शनची सूट पालिकेने दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याने त्यांच्यासाठी ही अट शिथिल करण्यात आली होती.
परंतु, याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत यापुढे कोरोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन आणण्याची गरज नाही, असा निर्णय झाल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.