मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांच्या उपचार खर्चापोटी विमा कंपन्यांकडे सादर केल्या जाणाऱ्या क्लेमच्या संख्येतही वाढ होत आहे. ३१ आॅगस्टपर्यंत राज्यातील सुमारे ७० हजार रुग्णांनी आपल्या उपचार खर्चाच्या परताव्यासाठी विमा कंपन्यांकडे अर्ज केले होते. ती रक्कम ९०० कोटी रुपये होती.जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील आकडेवारीनुसार देशभरातून ३१ आॅगस्टपर्यंत १ लाख ७९ हजार कोरोना रुग्णांचे २ हजार ७०० कोटी रुपयांचे क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल झाले. त्यापैकी १ लाख १० हजार रुग्णांची जवळपास १ हजार कोटी रुपयांची प्रतिपूर्ति कंपन्यांनी केली आहे. उर्वरित क्लेम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रातूनच जास्त क्लेम दाखल होत आहेत. त्यापैकी ७५ टक्के क्लेम हे मुंबई (२१,५००), पुणे (१५,८००) व ठाणे (८,५००) या शहरांतील आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो.शहरी भागांतील रुग्णांना सरासरी दीड लाख तर ग्रामीण भागातील रुग्णांना ७५ ते ९० हजार रुपयांपर्यंत क्लेमचा परतावा मिळत असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.१५ लाख लोकांनी काढली कोरोना पॉलिसीकोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांवर उपचार खर्चाचा भार पडू नये यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (आयआरडीएआय) सूचनेनुसार विमा कंपन्यांनी कोरोना कवच व कोरोना रक्षक या दोन विशेष विमा पॉलिसी बाजारात आणल्या. दीड महिन्यात जवळपास १५ लाख लोकांनी या पॉलिसी घेतल्या आहेत. साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या पॉलिसींमध्ये २५० ते ३ हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे विमा कव्हर मिळवता येते.
coronavirus: कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर, विमा कंपन्यांकडे ७० हजार रुग्णांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:38 AM