Coronavirus: तीन टप्प्यांत रुग्णालयांत होणार कोरोनावर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 07:14 PM2020-04-11T19:14:05+5:302020-04-11T19:14:35+5:30
या पार्श्वभूमीवर पालिका व राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत असून येत्या काळात नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनावर उपचार करण्यात येणार आहेत.
मुंबई – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकाही आता कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांचे तीन टप्प्यात वर्गीकरण करणार आहेत. यात कोरोना (कोविड-१९) केअर सेंटर, विशेष कोरोना हेल्थ सेंटर आणि विशेष कोविड रुग्णालय अशा तीन स्वरुपांत ही रुग्णालय तातडीने कार्यान्वित कऱण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका व राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत असून येत्या काळात नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनावर उपचार करण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष कोरोना रुग्णालयांत गंभीर कोरोना (कोविड-१९) रुग्ण व ज्यांना संबंधित दिर्घकालीन आजार आहे, अशा रुग्णांसाठी शहर उपनगरात २६ विशेष कोरोना रुग्णालय सुरु कऱण्यात आले आहेत. देशासह महत्त्वांच्या राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्र शासनाच्या वतीने शनिवारी कोरोनाविषयक उपचांराविषयीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा झाली आहे. त्यानुसार, राज्य व मुंबई महानगरपालिकेने त्वरित बदल करुन रुग्णालयांचे वर्गीकरण केले आहे. आतापर्यंत मुंबई शहर उपनगरात कोरोनाच्या रुग्णांनी हजारचा टप्पा ओलांडला असून मृतांची संख्येनेही सत्तरी पार केली आहे.
१८६ कोरोना केअर सेंटर दोन प्रकारच्या कोविड रुग्णांच्या अलगीकरणासाठी सुरु करत आहेत. त्यात दाट वस्तीतील अतिजोखमीचे सहवासित आणि चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत कोविड संशयित रुग्ण असतील. त्याचप्रमाणे, लक्षणे नसलेले कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांचा समावेश असणार आहे. याखेरीज, विशेष कोरोना हेल्थ सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी ११ विशेष कोरोना हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहेत.
.......................................
शहरातील रुग्णसंख्या हजार पार, मृतांचा आकडाही ७०च्या वर
मुंबईच्या २४ विभागांपैकी चार विभागात कोरोनाचे ५० टक्के रुग्ण
वरळी, भायखळा, ग्रँटरोड आणि वांद्रे येथे सर्वाधिक रुग्ण
शहर उपनगरात ३८५ हून अधिक विभाग प्रतिबंधित