Coronavirus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी, त्याचप्रमाणे उपचारासाठी तयारी पूर्ण - अमित देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:59 AM2020-03-24T02:59:30+5:302020-03-24T06:36:59+5:30
भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात निर्माण केलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार केलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक दूरी सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली.
भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात निर्माण केलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार केलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक दूरी सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविड १९ या विषाणूचे चाचणी केंद्र विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला १५० चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता १००० पर्यंत वाढविता येते. या चाचणी केंद्रासोबतच करोनाबाधितांसाठी ७० खाटांचे विलगीकरण कक्ष आणि १० खाटांचे अतिदक्षता केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची पाहणी देशमुख यांनी केली.