coronavirus: महानगरांच्या अवतीभोवतीच कोरोना व्हायरसचा विळखा, उर्वरित महाराष्ट्रासाठी दिलासादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 06:36 AM2020-05-16T06:36:13+5:302020-05-16T06:36:31+5:30
नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर राज्यातील एकूण आकडा आता २९ हजार १०० झाला आहे. दिवसभरात ४९ बाधितांना आपला जीव गमवावा लागला, तर ५०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी पंधराशेच्या पुढे राहिली. मात्र, यातील बहुतांश रुग्ण हे मुंबई, पुणे अशा महानगर क्षेत्रातील असल्याने उर्वरित महाराष्ट्रासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात १ हजार ५७६ नवीन रुग्णांपैकी एकट्या मुंबई महानगराचा समावेश असलेल्या ठाणे मंडळात १२३९ आणि पुणे मंडळातील १८९ रुग्णांचा समावेश आहे. १५७६ पैकी १४२८ रुग्ण याच दोन मंडळांत आढळले.
नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर राज्यातील एकूण आकडा आता २९ हजार १०० झाला आहे. दिवसभरात ४९ बाधितांना आपला जीव गमवावा लागला, तर ५०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण ६ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या ४९ कोरोनाबाधितांमध्ये २९ पुरुष आणि २० महिलांचा समावेश आहे. या ४९ मृत्यूंपैकी तब्बल २२ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते, तर २३ जण ४० ते ६० या वयोगटातील होते. तर, चौघांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४९ मृतांपैकी ३२ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १०६८ इतकी झाली आहे. आजच्या ४९ मृत्यूंमध्ये मुंबईत सर्वाधिक ३४, पुण्यात ६, अकोला शहरात २, कल्याण-डोंबिवलीमध्ये २, धुळ्यात २, पनवेलमध्ये १, जळगाव १ तर औरंगाबाद शहरातील एकाचा समावेश आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १ हजार ४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १४ हजार १६७ सर्वेक्षण
पथकांनी काम केले असून त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.