coronavirus: घरांच्या भाडे करारांनाही कोरोनाचे ग्रहण, ४२ दिवसांत जेमतेम २८ करार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 08:00 AM2020-05-13T08:00:36+5:302020-05-13T08:00:55+5:30
गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत मुंबई शहरांत ४६,६०७ भाडे करार (दररोज सरासरी ७७६) नोंदविले गेले होते. यंदा १२ मेपर्यंत ती संख्या जेमतेम २८पर्यंत पोहचल्याची माहिती हाती आली आहे.
मुंबई : शाळा, महाविद्यालयांची उन्हाळी सुटी, कार्यालयांतील अंतर्गत बदल्या, नवी नोकरी, नवी शाळा अशा अनेक कारणांमुळे एप्रिल आणि मे महिन्यांत घर बदलण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परंतु, कोरोनामुळे या स्थलांतरालाही ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत मुंबई शहरांत ४६,६०७ भाडे करार (दररोज सरासरी ७७६) नोंदविले गेले होते. यंदा १२ मेपर्यंत ती संख्या जेमतेम २८पर्यंत पोहचल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत ई रजिस्ट्रेशनसह २२ हजार ८१२ भाडे करार (लिव्ह अॅण्ड लायसन्स) झाले होते. त्यातून सरकारला ९ कोटी ९४ लाखांचा महसूल प्राप्त मिळाला. यंदा एप्रिलमध्ये झालेल्या २७ करारांपोटी फक्त ४३ हजार रुपये मिळाले.
गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या २३ हजार ७९५ करारांमुळे ९ कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला होता. यंदा १२ मेपर्यंत अवघ्या एका कराराची नोंदणी झाली असून प्राप्त महसूल ४२३ रुपये आहे.
कोरोनामुळे प्रत्येकावर आर्थिक अरिष्ट कोसळल्याने कुणीही घर बदलण्याच्या मानसिकतेत नाही. ज्यांना घर बदलणे अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी ई रजिस्ट्रेशनचा पर्याय आहे. मात्र, इस्टेट एजंट ते काम करण्यासाठी घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकत नाही.
तसेच, त्या नोंदणीसाठी मशिनवर थम्ब इम्प्रेशन गरजेचे असते. ते करण्यास कुणी धजत नाही. त्यामुळे सारे व्यवहार थंडावले असून इस्टेट एजंट अक्षरश: रडकुंडीला आल्याची माहिती एका इस्टेट एजंटने दिली. ज्यांचे भाडे करार संपले आहेत त्यांनी सहमतीने काही महिन्यांसाठी मुदत वाढवल्याचेही त्यांनी सांगितले.
गृह खरेदी-विक्री शून्यावर
नव्या घरांच्या खरेदी, विक्रीची चर्चा सर्वत्र असली तरी जुन्या घरांचे व्यवहारही (रिसेल) याच दोन महिन्यांत प्रामुख्याने होत असतात. गेल्या वर्षी मुंबईत एकूण घरांच्या खरेदी विक्रीचे १२ हजार २२० व्यवहार झाले होते. त्यांच्या मुद्रांक शुल्कापोटी ९९३ कोटींचा महसूल सरकारला मिळाला होता. यंदा लॉकडाउननमुळे या दोन महिन्यांत एकही व्यवहाराची नोंदणी झाली नसून महसुलानेही भोपळा फोडलेला नाही.