Coronavirus: कोरोनाची बस, रेल्वे स्थानक, टोलनाक्यावरून होतेय इंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 08:16 AM2021-03-22T08:16:42+5:302021-03-22T08:17:04+5:30
मात्र हे प्रमाणदेखील कमी असून, वेगाने वाढणारी कोरोनाचे लाट थोपवायची असेल तर टोलनाके, एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानके येथे वेगाने आणि ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी मुंबई पालिकेने कठोर निर्बंध जारी केले असून, कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी वेगाने कार्यवाही सुरू झाली आहे. परंतु टोलनाके, एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानके येथे पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणाने कोरोना चाचणी होणे आवश्यक असतानाच येथे मोठ्या अडचणी आहेत. कारण एसटी स्टँड आणि टोलनाक्यांवर तर अक्षरश: जीवाशी खेळ सुरू असून, रेल्वे स्थानकांत काही प्रमाणात आरोग्याची सुरक्षा घेतली जात आहे. मात्र हे प्रमाणदेखील कमी असून, वेगाने वाढणारी कोरोनाचे लाट थोपवायची असेल तर टोलनाके, एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानके येथे वेगाने आणि ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.
चाचणी हवी सक्तीची
मुंबई शहर आणि उपनगरांत वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता, मुंबई महापालिकेने मुंबई आणि वॉर्ड स्तरावर मोठ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र टोलनाक्यांवर याबाबत हलगर्जीपणा बाळगण्यात येत आहे. कारण मुंबईत दाखल होत असतानाच दहिसर, वाशी, मुलुंड येथील दोन आणि ऐरोली टोलनाक्यांवर कोरोनाची चाचणीच होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच असून, यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हणणे जागृत नागरिकांनी मांडले आहे.
मुंबईत दाखल होताना जे पाच टोलनाके लागतात, त्या टोलनाक्यांवर मुंबई महापालिकेकडून कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. मात्र ते बाहेरील जिल्ह्यांतून अथवा बाहेरील राज्यांतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करीत नाहीत; कारण त्यांना तशी कारवाई करण्याचे आदेशच नाहीत किंवा तसा काही प्रोटोकॉल नाही. प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही, एवढेच त्यांना तपासायचे आहे.
परिणामी कोरोनाची चाचणी होत नाही. म्हणजे मराठवाडा किंवा विदर्भातील एखाद्या जिल्ह्यातून एखादा प्रवासी मुंबईत दाखल झाला तर त्याची कोरोना चाचणी टोलनाक्यावर होत नाही.
मात्र अशा प्रवाशांत एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर मात्र तो अनेकांना लागण करू शकतो, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, परराज्यांतून जे प्रवासी महाराष्ट्रात दाखल होत आहेत, त्यांच्या कोरोना चाचण्या सीमेवरच केल्या जातात; त्यामुळे टोलनाक्यांवर अशा चाचण्या होत नाहीत.
ना प्रवाशांची तपासणी, ना जंतुनाशकांची फवारणी!
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. एसटी प्रशासनाला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कारण प्रवाशांची कोरोना चाचणी सोडाच; पण एसटी गाड्या किंवा आगारात जंतुनाशकांची फवारणीही केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक अशा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यातील या महत्त्वाच्या शहरांतून मुंबईमध्ये शासकीय वा खासगी कामानिमित्त दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांची चाचणी करणे गरजेचे आहे. परंतु, एसटीच्या मुंबईतील आगारांमध्ये फेरफटका मारला असता तेथे परराज्य वा परजिल्ह्यांतून दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले.