Join us

coronavirus: महाराष्ट्रातील काही भागांत कोरोनाचा सामुदायिक संसर्ग, रोग सर्वेक्षण अधिकारी आवटे यांनी व्यक्त केली शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:12 AM

कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषत: मुंबईत तर अलीकडच्या दिवसांत रोज ७०० ते ८०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाची (कम्युनिटी स्प्रेड) प्रक्रिया सुरू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाबाबत मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी सामुदायिक (कम्युनिटी) संसर्ग झाल्याची शक्यता राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली आहे. बाधित व्यक्तीशी निकटचा संपर्क अथवा परदेश प्रवास केलेला नसतानाही कोरोनाची बाधा झाल्याची काही उदाहरणे आढळून आली आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची पार्श्वभूमी काटेकोरपणे तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषत: मुंबईत तर अलीकडच्या दिवसांत रोज ७०० ते ८०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाची (कम्युनिटी स्प्रेड) प्रक्रिया सुरू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. याबाबत डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या समूह (क्लस्टर) संसर्गाच्या घटना आपल्यासमोर आहेत. शिवाय, काही ठिकाणी सामुदायिक संसर्गाचेही पुरावे मिळत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात सामुदायिक संसर्ग उद्भवल्याची निरीक्षणे आहेत. मात्र, काही ठिकाणी सामुदायिक संसर्ग आढळला असला तरी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता समूह संसर्गाचेच चित्र आपल्याकडे आहे.सामुदायिक संसर्गाचा धोका लक्षात घेत प्रत्येक कोरोनाबाधिताची तपशीलवार माहिती जमा करावी लागेल. प्रत्येक बाधित रुग्णाच्या संसर्गाची साखळी शोधावी लागेल. परदेश प्रवास केलेला आहे का किंवा एखाद्या बाधित व्यक्तीशी निकटचा संपर्क आला का, अशा सर्व बाबींची माहिती प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत जमा करावी लागेल....म्हणूनच मुंबईत संख्या जास्तमुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत आवटे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील सामाजिक, आर्थिक स्वरूप अन्य महानगरांच्या तुलनेत खूप वेगळे आहे. अन्य महानगरांच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता जास्त आहे. एका चौरस किलोमीटरच्या परिसरात वीस हजार लोकांची वस्ती आहे. लोकसंख्येच्या या घनतेमुळेच मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे आवटे म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई