Coronavirus: कोरोनावर नियंत्रण, मान्सूनपूर्व कामांचे नवीन टीमपुढे आव्हान; तीन अधिकाऱ्यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:25 AM2020-05-09T03:25:18+5:302020-05-09T03:25:36+5:30
नेतृत्वात बदल : मुंबई महापालिकेत तीन नवीन सनदी अधिकारी
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात मद्यविक्री, मजुरांचा रोष, दुकाने सुरू ठेवण्याबाबत सतत निर्णयात बदल होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विरुध्दच्या मोहिमेला प्रभावी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या या नव्या टीमपुढे कोरोनावर मात, मान्सूनपूर्व कामांना वेग आणि आर्थिक बाजू भक्कम करण्याचे आव्हान आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात पालिका आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली होती. लातूरचा भूकंप आणि सांगली, कोल्हापूर येथील पूर या आपत्ती काळात प्रभावी पुनर्वसनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यामुळे कोरोनाचे संकट त्यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रणात आणणे शक्य होईल, असा विश्वास राज्य सरकारला होता. मात्र मुंबईत लॉकडाउनची अंमलबजावणी, पालिका रुग्णालयातील व्यवस्थापन यावरून परदेशी यांचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे परदेशी यांच्या जागेवर नगर विकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची पालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज आणि आबासाहेब जºहाड यांच्या जागेवर अश्विनी भिडे आणि संजीव जैस्वाल हे आपल्या कामामुळे चर्चेत असलेले दोन सनदी अधिकारी पालिकेच्या टीममध्ये सहभागी झाले आहेत. पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात स्थापन करण्यात आलेल्या वॉर रूमची जबाबदारी यापूर्वीच भिडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यात संजीव जैस्वाल यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
कोरोनाबरोबरच या संकटाचे आव्हान...
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होते. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे जलद गतीने होणे आवश्यक आहे. मात्र कोरोनामुळे नाल्यांची सफाई, रस्ते दुरुस्ती अशी महत्त्वाची कामे ठप्प झाली. पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना उरला असताना पालिकेने नाले सफाई सुरू केली आहे. ही कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणे आव्हानात्मक ठरणार आहे.
नवीन टीम पुढील आव्हाने... : धारावी, वरळी अशा झोपडपट्टी भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाय योजना तोकड्या पडत आहेत. त्यामुळे नवनियुक्त अधिकाऱ्यांवर याची विशेष जबाबदारी असणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या सात सनदी अधिकाºयांच्या पथकावर प्रत्येक परिमंडळात कोरोना रोखण्याची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. यामध्ये भिडे यांच्याकडे परिमंडळ सहा म्हणजे घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या विभागांची जबाबदारी आहे.