coronavirus: १० हजार विवाह मुहूर्तांना कोरोनाचा फटका; साडेचार कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:06 AM2020-05-16T04:06:31+5:302020-05-16T04:07:04+5:30
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, मार्च ते जून या काळात लग्नाचे एकूण ३८ तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्नाचे एकूण १४ मुहूर्त आहेत.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मार्च ते जून महिन्यांचा कालावधी म्हणजे लग्नसराईचा हंगाम. दरवर्षी या तीन महिन्यांत हजारो विवाहसोहळे पार पडत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे या तीन महिन्यांत राज्यभरातील तब्बल १० हजार विवाहांचे मुहूर्त पाण्यात गेल्यामुळे लग्नसराईशी संबंधित व्यवसायांवर अमंगळ छाया पसरली आहे. वर्षभरातील सर्वाधिक म्हणजेच जवळपास ४० ते ५० टक्के व्यवसाय याच काळात होत असल्यामुळे किमान साडेचार कोटींच्या आर्थिक नुकसानीला लग्नसमारंभाशी निगडित सर्वच व्यावसायिकांना सामोरे जावे लागले आहे. मुंबई कॅटरिंग असोसिएशनने ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, मार्च ते जून या काळात लग्नाचे एकूण ३८ तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्नाचे एकूण १४ मुहूर्त आहेत. मात्र टाळेबंदी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे टाळेबंदी उठल्यानंतरही उर्वरित महिन्यांत समारंभ होण्याची शक्यता दुरावली आहे. गेल्या काही वर्षांत लग्नसराई व्यवसायात केवळ सभागृह, केटरिंग आणि मंडप व सजावट कंत्राटदार आणि त्यांचे कर्मचारी यांच्यापुरताच मर्यादित राहिला नसून छायाचित्रकार, मेकअप आर्टिस्ट, इव्हेंट व्यवस्थापक, फूल व्यवसायिक, नृत्य-संगीत कलाकार, डेस्टिनेशन वेडिंग असा चौफेर विस्तारला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील एकूण पाच लाख कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. टाळेबंदीच्या काळात या व्यवसायातील सुमारे ७० टक्के मजूर आपल्या राज्यात परत गेले आहेत.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मुंबई कॅटरर्स संघटनेने या संकटावर भविष्यात कशी मात करता येईल याचा एक आराखडा तयार केला आहे. त्याची अधिक माहिती देताना मुंबई कॅटरिंग असोसिएशन यांनी सांगितले की, टाळेबंदी उठल्यानंतर होणाऱ्या लग्नसमारंभासाठी मुंबई कॅटरिंग संघटनेने एक नियमावली आखून घेतली आहे. या नियमावलीप्रमाणे लग्नसराई व्यवसायात सहभागी असलेल्या प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी, समारंभाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकीकरण, लग्न समारंभाला येणाºया लोकांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे कठोर नियम आणि आव्यशक तिथे मास्कचा वापर असे काटेकोर नियम राबविण्यात येतील.
तिन्ही झोननुसार टाळेबंदी हळूहळू शिथिल करताना सरकार प्रत्येक उद्योगधंद्यासाठी आणि इतर व्यावसायिकांसाठी ज्या प्रकारे नियमावली तयार करीत आहे तशीच नियमावली सरकारने कॅटरिंग व्यवसायाबाबतही करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे. नेहमी पंचतारांकित हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरन्ट यांना नजरेसमोर ठेवून प्रशासनातर्फे काही नियम तयार केले जातात. मात्र कॅटरिंग व्यवसाय हा या सगळ्यांपेक्षा वेगळा असल्याने आणि तो आउटडोअर स्वरूपाचा असल्याने प्रशासनाचे नियम या व्यवसायाला लागू करणे आणि त्यावर अंमल करणे शक्य होणार नाही.
कॅटरिंग व्यवसाय हा असंघटित असल्यामुळे आम्ही आता मुंबई कॅटरर्स संघटनेमार्फत शहरातील सर्व कॅटरर्सना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून या संकटाचा मुकाबला एकत्रितपणे करता येईल. त्यामुळे एफडीएने मुंबई कॅटरर्स संघटनेची मागणी लक्षात घेऊन मदतीचा हात द्यावा, अशी विनंतीही संघटनेने केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात मुंबई कॅटरर्स असोसिएशन राज्य सरकारबरोबर सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असा विश्वास या संघटनेने शेवटी व्यक्त केला.