Join us

coronavirus: दादर, माहीममध्ये दोन महिन्यांत वाढले कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 2:53 AM

दादरमध्ये ११ जुलै रोजी एकूण ११३० बाधित रुग्ण होते. आताच हेच प्रमाण २ सप्टेंबर रोजी २६४०वर पोहोचले आहे. यापैकी सध्या ३५६ रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबई : सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या कोरोना लढ्याचा डंका संपूर्ण जगात वाजतो आहे. त्याच वेळी जी उत्तर विभागाच्या अखत्यारीतील दादर आणि माहीम विभागात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. या विभागांमध्ये आतापर्यंत ४९४६ रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाढले आहेत.दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने सोशल डिस्टन्सिंग अवघड असलेल्या धारावीत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ९५ आहे. जास्तीत जास्त लोकांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि त्वरित डिस्चार्ज या उपाययोजनांमुळे धारावीमध्ये बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत दररोज धारावीमध्ये सरासरी चार ते पाच बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याच वेळी धारावीच्या शेजारचे विभाग असलेले दादर आणि माहीम परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.दादर परिसर हे मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे मोठी बाजारपेठ आहे. ३ जूनपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दादर परिसरातील गर्दीही दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सव काळात या ठिकाणी खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. परिणामी बाधित रुग्णांची संख्या आता वाढलेली दिसून येत आहे. मात्र या विभागांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आल्यामुळे ही वाढ दिसून येत असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. या बाधित रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांमध्ये लक्षणे नसून उत्तुंग इमारतींमधील रहिवाशांचा यात समावेश आहे.दादरमध्ये ११ जुलै रोजी एकूण ११३० बाधित रुग्ण होते. आताच हेच प्रमाण २ सप्टेंबर रोजी २६४०वर पोहोचले आहे. यापैकी सध्या ३५६ रुग्ण सक्रिय आहेत.माहीममध्ये २८ जून रोजी १०९२ एकूण रुग्ण होते. आतापर्यंत एकूण २३०६ बाधित रुग्ण आढळले असून यापैकी २८७ सक्रिय आहेत.दादर, माहीम, धारावी या जी उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या परिसरांमध्ये आतापर्यंत एकूण सात हजार ७३८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६५४१ कोरोनामुक्त झाले असून सध्या ७३८ रुग्ण सक्रिय आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई