Coronavirus: बाधितांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:46 AM2020-05-05T01:46:06+5:302020-05-05T01:46:20+5:30
धोका वाढतोय : महापालिकेची शोधमोहीम सुरू; काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तींमध्ये प्रभावी क्वारंटाइन शक्य नसल्याने ‘क्लोज काँटॅक्ट’ म्हणजे बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांची चाचणी केली जात आहे. मात्र समूह संसर्ग अद्याप आढळून आलेला नाही, असे स्पष्ट करीत आवश्यक खबरदारी मात्र नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या नऊ हजारपर्यंत पोहचली आहे. तर आतापर्यंत साडेतीनशे लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. मात्र ३ ते १७ मे या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दररोज सरासरी चारशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. यामुळे समूह संसर्गाचा धोका वर्तविण्यात येत आहे.
मे महिन्यात रुग्णांचा आकडा ७० हजारांवर पोहचेल, असे बोलले जात होते. केंद्रीय पथकाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत येऊन बाधित क्षेत्रांची पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार पालिकेने चाचणी आणि क्वारंटाइनची क्षमता वाढवली आहे.
त्यामुळे अधिकाधिक नागरिकांची चाचणी येत्या काही दिवसांत केली जाणार आहे़
काय आहे काँटॅक्ट ट्रेसिंंग?
काँटॅक्ट ट्रेसिंंग म्हणजे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीला शोधणे आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढल्याचे दिसून येत आहे, असा पालिकेचा दावा आहे.
आतापर्यंत केलेली काँटॅक्ट ट्रेसिंंग...
मुंबईत आतापर्यंत सुमारे नऊ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पालिकेने ३० एप्रिलपर्यंत एक लाख ३० हजार लोकांचे काँटॅक्ट ट्रेसिंंग केले आहे. यामध्ये तीन हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर सहा हजारांहून अधिक रुग्णांना इतर आजार असलेले आढळले आहेत.