कुलदीप घायवट
मुंबई : शहर आणि उपनगरातील कामगारांनी गजबजलेले नाके मागील दीड महिन्यापासून शांत झालेत. मुंबई महानगरातील लाखोंच्या संख्येने नाका कामगार, मजूर एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. अनेक कामगारांची राहण्याची, जेवणाची सोय नाही. त्यामुळे कोरोनाऐवजी भूकबळीने कामगार मरण पावणार आहेत. औरंगाबाद येथील करमाड येथे मालगाडीने मजुरांचा मृत्यू झाला, अशा आणखी अपघातांनी कामगारांचा मृत्यू होण्याची वाट बघायची का, असा सवाल कामगार नेत्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने लॉकडाउन घोषित करण्याअगोदर ‘श्रमिक विशेष ट्रेन’ सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने सर्व कामगारांची आता दयनीय अवस्था झाली आहे, अशी प्रतिक्रिया कामगार नेत्यांनी दिली.
सरकारने नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता लॉकडाउन घोषित केले. परिणामी, नागरिक एकाच ठिकाणी अडकून पडले. सामान्य नागरिकदेखील यात भरडले गेले. सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. मजूर, कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. सरकार, प्रशासकीय विभागाने आणखी ताकदीने काम केले पाहिजे, अशी भूमिका कामगार नेत्यांनी मांडली.प्रशासनाने ताकदीने काम करणे अपेक्षितआता कोरोनामुळे आणखी वाईट अवस्था या नाका कामगारांची, मजुरांची झाली आहे. गावाला जाऊन शेती किंवा शेतमजुरीचे काम सध्या करू शकतो. आता बाजारातदेखील जास्त गर्दी आहे. त्यामुळे प्रशासनाने कामगार, मजुरांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने आणखी ताकदीने काम करणे अपेक्षित आहे. - रमेश चव्वल, नाका कामगार, पार्लेभूकबळीला सामोरे जावे लागत आहेवरळीमधील जिजामाता नगर, रमाबाई नगर येथील मजुरांची परिस्थिती बिकट झाली आहे. मानखुर्द येथील मजुरांना खाण्यासाठी काही मिळत नाही. काही ठिकाणी अन्नाचा पुरवठा अपुरा पडत आहे. अनेक कामगार वरळी ते भिवंडी रोडपर्यंत पायी प्रवास करीत आहेत. तेथून ट्रेन किंवा इतर वाहनांनी ते त्यांच्या राज्यात जाणार आहेत. - सुगंधी फ्रान्सिस, महिला कामगार नेत्यामजूर, कामगारांना ओळखपत्र द्यादररोज पाच लाख नाका कर्मचारी येथे काम करीत असत. मात्र आता नाके सुने झाले आहेत. या प्रत्येक कर्मचाºयाला मदतीचा हात दिला पाहिजे. मुंबई, नवी मुंबई यामधील बांधकाम या मजुरांमुळे शक्य आहे. ‘परप्रांतीय’ म्हणून माणुसकी विसरू नये. आता तयार केलेली यंत्रणा लॉकडाउनआधीच करणे अपेक्षित होते. ठेकेदार नाका कामगारांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करतात. सरकारकडून प्रत्येक कामगार, मजुराचे ओळखपत्र तयार केले पाहिजे. - नरेश राठोड, अध्यक्ष,सेवा नाका कामगार संघटनाश्रीमंत विमानाने तर सर्वसामान्य पायी घरी जात आहेतसरकारची माहिती कामगारांपर्यंत योग्यरीत्या पोहोचत नाही. अनेक पोलीस चौकींबाहेर ७००-८०० मजूर उभे राहिले आहेत. मजुरांना मागील दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे थोडेच पैसे शिल्लक आहेत. एकीकडे श्रीमंतांची मुले विमानेने घरी पोहोचत आहेत. मात्र दुसरीकडे मजूर, त्यांची मुले पायी वाटचाल करीत आहेत. ‘श्रमिक विशेष ट्रेन’ उशिरा सोडण्यात आली आहे. रोजगार बुडालेल्या कामगारांकडून तिकिटांचे पैसे घेणे अन्यायकारक आहे. ही वेळ अर्थव्यवस्था सांभाळण्याची नसून आपत्तीचे व्यवस्थापन करण्याची आहे. - सीताराम शेलार, मुंबई अभ्यासक