मुंबई : कोरोनामुळे देशात हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हात धुणे, मास्कचा वापर सर्व जण करत आहेत. मास्कची सवय आपण लवकर स्वीकारली, पण हेल्मेट न घातल्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना अद्यापही दुचाकीस्वार हेल्मेटकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले
लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरू होती. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर अनेक चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. याबाबत वाहतूक अभ्यासक संदीप गायकवाड म्हणाले की, हेल्मेट सक्तीला समाजातून, विविध वर्गांतील लोकांकडून कायमचा विरोध होताना दिसून येतो. एकट्या पुण्यात मागील १५ वर्षांत किमान ८-१० वेळा हेल्मेट सक्तीची कारवाई झाली. प्रत्येक वेळी पुणेकरांनी अगदी शूरवीर योद्ध्याप्रमाणे ही कारवाई हाणून पाडली आणि रिकामे डोके हेल्मेट न घालता रस्त्यावर फिरू लागले. तर आज मास्क घालण्याबाबत कायदा आणि नियम आहेत. परंतु, मास्क घालण्याबाबत फार कारवाई न करताही, लोक सर्रास मास्क वापरतात. कोरोनामुळे आपण मास्क तर घालायला लागलो, पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार, असा सवाल त्यांनी विचारला.तर याबाबत युनायटेड वे संस्थेचे संस्थापक अजय गोवले म्हणाले की, कोरोनामुळे सर्व गाड्या रस्त्यावर नसल्याने दुचाकीस्वारांना मोकळीक मिळाली आहे. तर शासन यंत्रणा कोरोना आणि इतर कारवाईत व्यस्त आहे. त्यामुळे कारवाई होईल की नाही, त्याबाबत चालकांमध्ये शंका आहे. लोकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली.