मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून शहरांतील कोरोनाने ग्रामीण भागांतही शिरकाव केला आहे. राज्यात केवळ वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असून अन्य सर्व जिल्ह्यांत कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे राज्य शासनासह मुंबई महापालिकेसमोर कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात गुरुवारी १ हजार २१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या १७ हजार ९७४ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ४३ मृत्यूंची नोंद झाली असून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ६९४ झाली आहे.
दरम्यान, मुंबईत दिवसभरात ६९२ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्येने ११ हजार ३९४ इतका टप्पा गाठला आहे. तर दिवसभरात २४ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ४३७ झाला आहे. कोरोनाच्या महासंकटात दिलासाजनक बाब म्हणजे राज्यात दिवसभरात २०७ तर आजपर्यंत ३ हजार ३०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात नोंद झालेल्या ४३ मृत्यूंपैकी मुंबईतील २४, पुण्यातील ७, वसई - विरार येथील पाच, सोलापूर शहरातील दोन, अकोला, पालघर आणि औरंगाबाद शहरात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्या राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १०८७ कंटेनमेंट झोन असून एकूण १२ हजार २१ हजार सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.७६ लोकसंख्येचे सर्वेक्षण केल आहे.
रुग्णालयात भरती असणारे ५९ टक्के रुग्ण लक्षणविरहित एक टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज राज्यात विविध रुग्णालयांत भरती असणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी ५९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर ३६ टक्के रुग्ण सौम्य ते माध्यम लक्षण असणारे आहेत. पाच टक्के रुग्ण गंभीर असून त्यातील ३ टक्के रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणार आहेत. तर १ टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे.