Coronavirus: मुंबई शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; दिवसभरात २५ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:20 AM2020-05-09T03:20:57+5:302020-05-09T03:21:07+5:30
तर ७४८ संशयित रुग्णांची झाली नोंद
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, शुक्रवारी राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३७ रुग्णांपैकी २५ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. २५ पैकी १३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील १३ रुग्ण पुरुष १२ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ जणांचे वय ४० खाली होते. १३ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित ९ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर ७४८ संशयित रुग्ण आढळले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाबाधितंची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. विशेषत: वरळी, धारावी, कुर्ला, दहिसर, माहीमसह बहुतांश ठिकाणी रुग्णांची संख्या वाढतच असून, आता कोरोना नष्ट करण्यासाठी मुंबईकरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा विळखा वाढतच असून, शुक्रवारी माहीममध्ये ११ रुग्ण नव्याने आढळले. येथील एकूण रुग्णसंख्या १०७ झाली असून, २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दादर येथे २१ रुग्ण नव्याने आढळले. येथील एकुण रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. तर १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत २५ रुग्णांची नोंद झाली. येथील रुग्णांची संख्या आता ८०८ झाली आहे. २२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबईकरांनी अधिकाधिक सजग राहिले पाहिजे, असे म्हणणे सर्वच स्तरातून मांडले जात आहे.
रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण
वाडी बंदर येथील रेल्वे पोलीस आयुक्तालयातील पोलिसाला कोरोनाची लागण झाली. त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस आयुक्तालयातील तांत्रिक विभागात काम करणाऱ्या या पोलीस कर्मचाºयाचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, त्याच्या संपर्कातील इतर कोणत्याही पोलीस कर्मचाºयाला अद्याप क्वारंटाइन केलेले नाही. दरम्यान, संपूर्ण कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले आहे. पालिकेला यासंदर्भात कळविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली.