CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

By स्नेहा मोरे | Published: April 19, 2020 06:43 PM2020-04-19T18:43:39+5:302020-04-19T18:46:04+5:30

CoronaVirus : बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.

CoronaVirus: Counseling for patients is important, opinion of psychiatrist | CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

Next

 - स्नेहा मोरे

मुंबई – नायर रुग्णालयात कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर या रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. कोरोनाच्या महासंकटाने शारिरीक आऱोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यविषयक प्रश्नही गंभीर केला आहे. या रुग्णांच्या औषधोपचार प्रक्रियेत मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे याचा विचार करुन रुग्णालयीन पातळीवर रुग्णांचे समुपदेशन झाले पाहिजे. तसेच, घरगुती अलगीकरण (होम क्वारंटाइन) वा विलगीकरण केलेल्या व्यक्तींच्याही मानसिक स्वास्थ्याचा विचार होणे गरजेचे आहे.

बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे. घरगुती अलगीकरण, कोरोना संशयित वा विलगीकरण प्रक्रियेतील रुग्णांचे मानसिक संतुलन बिघडण्याचा धोका संभावतो. एखाद्या व्यक्तीची स्वॅब चाचणी केल्यानंतर वैद्यकीय अहवालासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागतो, या काळात त्या व्यक्तीची आणखी कसोटी लागते. दरम्यान कोरोनाविषयक भीतीदायक वातावरणाने अधिक नकारात्मक विचार येत असतात, अशा वेळेस त्या व्यक्तीशी संवाद साधणे, धीर देणे, त्याची सकारात्मक उर्जा वाढीस लावणे, या आजाराच्या काळातून बरा होशील असा विश्वास देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया यांनी व्यक्त केले.

एखाद्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे मानसिक बळ वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, कोरोना संशयित, रुग्ण वा होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींशी बहिष्कृतपणे वागणे हे अत्यंत चुकीचे आहे. ही वागणूक त्या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर खोलवर परिणाम करुन त्या व्यक्तीचे आरोग्य धोक्यात आणू शकते हे लोकांनी लक्षात ठेवावे.आपल्याकडील यंत्रणा बऱ्याचदा शारिरीक बरे होण्याकडे लक्ष देतात मात्र मानसिकरित्या सुदृढ असण्याचा विचार प्रामुख्याने केला जात नाही, अशी खंत डॉ. लोहिया यांनी नमूद केली.

माणसाचे शारीरिक आरोग्य बहुतांशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे मानसशास्त्र सांगते. मन निरोगी नसेल तर शरीरही निरोगी राहू शकत नाही. मनोविकारांवर प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असूनही रुग्णांमध्ये मानसोपचारांबाबत अनभिज्ञता आढळून येते. औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, वर्तन उपचार, आदी उपचार पद्धती मनोरुग्णांसाठी उपलब्ध आहेत. बहुतांशी मनोविकार योग्य वेळी नियमितपणे उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात. मात्र उपचारांबाबत अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारांवर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. त्यामुळे मनोविकार व मानसोपचारांबाबत लोकशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेश शिंगणे यांनी व्यक्त केले.

मानसिक स्वास्थ्यासाठी हे महत्त्वाचे !
केवळ मानसिक आजार नसणे किंवा तो असल्यास त्यावर उपाय करणे म्हणजेच फक्त मानसिक स्वास्थ्य जोपासणे नव्हे; तर दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना मनोबलाप्रति उचललेली जाणीवपूर्वक पावलेही महत्त्वाचे योगदान करतात. केवळ आनंदच नव्हे, तर आजूबाजूच्या जगाप्रति वाटणारी प्रतिबद्धता, आत्मविश्वास, ‘स्व’त्वाच्या कल्पना व आपण तणावस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकू, ही निष्ठा कोणाकडे मागून न मिळणारी, परंतु स्वत: जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास साध्य होऊ शकणारी बाब म्हणजे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्याला पोषक व धोकादायक गोष्टींचा विचार सातत्याने करत त्यानुसार पर्यायांची निवड करावी व निर्णय घ्यावेत. शोषणविरहित आयुष्य जगून मानसिक स्वास्थ्याचा अवलंब हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. प्रत्येकाने तो स्वत: व इतरांप्रति वागताना जपावा. हा अधिकार प्रत्येकाकडून व प्रत्येकासाठी जपला जाईल यासाठी विशेष पावले उचलावी.

Web Title: CoronaVirus: Counseling for patients is important, opinion of psychiatrist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.