Coronavirus : चिंताजनक! कोरोनानं राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ९७ मृत्यू, रुग्णांची संख्या १३६४वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 11:02 PM2020-04-09T23:02:27+5:302020-04-09T23:02:50+5:30
राज्यासह मेट्रो शहरांत वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून अधिक कठोर नियमांची आखणी करण्यात येत आहेत.
मुंबई – राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही गंभीर असून, वाढत्या आकड्याला रोखण्यासाठी शासन अधिक कठोर नियम करण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय पातळीवर राज्यात आणि राज्याच्या पातळीवर मुंबईत कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने पसरतोय. राज्यात गुरुवारी २२९ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईच्या महानगरीत गुरुवारी १६२ नवे कोरोना बाधित आढळले आहे. परिणामी, राज्याची एकूण रुग्णसंख्या १ हजार ३६४वर पोहोचली आहे. तर राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही ९७वर पोहोचला आहे. राज्यासह मेट्रो शहरांत वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून अधिक कठोर नियमांची आखणी करण्यात येत आहेत.
दिल्लीत सहभागींपैकी राज्यातील सहभागींपैकी २५ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती अधिक चिंताजनक असून, सध्या आरोग्य यंत्रणेसह प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत १६२ इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, आता शहर आणि उपनगरांतील कोरोना रुग्णांची संख्या ८७६वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहर उपनगरातील ३८० हून अधिक परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. याखेरीज, नऊ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा ५४ वर पोहोचला आहे.
सहवासितांचा शोध घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनेक चमूमार्फत आजपर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि २ हजार ८०६ अतिजोखमीचे सहवासितांचा शोध घेऊन चाचणी करण्यात आली. तसेच घरोघरी जाऊन आजपर्यंत १५०० इतके नमुने पाच चमूमार्फत एकत्रित करण्यात आले. प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये करण्यात आले, त्वरित कार्यवाहीमुळे सर्व सहवासितांना अलगीकरण करुन त्या त्या क्षेत्रांमध्ये आजाराचा प्रसार कमी झाल्याचे दिसून येत आहे.
..................................
गुरुवारी २५ मृत्यूंची नोंद , १०१ वर्षांच्या महिलेचा बळी; अतिजोखमीच्या आजाराचे सर्वाधिक मृत्यू
राज्यात कोरोना बाधितांच्या २५ मृत्यूंपैकी १४ पुण्यातील , नऊ मुंबईतील, मालेगाव व रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. यात १५ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. २५ मृतांपैकी १२ जण ६० वर्षांवरील आहेत. तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये ८४ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा व हृदयविकार अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आहेत. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ९७ झाली आहे.
...........................................................
४४२ संशयितांचे नमुने
प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये संशयित कोरोना (कोविड१९) रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले. ५ ते ८ एप्रिल दरम्यान ४० क्लिनिक सुरू करण्यात आले. त्यात १ हजार ५८८ लाभार्थींपैकी ४४२ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत.
..................................
आज निदान झालेले रुग्ण १६२
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ४०३
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण ८७६
एकूण मृत रुग्णांची संख्या ५४
आज कोविडमुक्त झालेले रुग्ण ०६
एकूण कोविडमुक्त झालेले रुग्ण ६५
आतापर्यंत एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ३७४३