CoronaVirus: मुंबईत आता कोविड क्लिनिक कार्यान्वित; दहा ठिकाणी सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 09:31 PM2020-04-04T21:31:17+5:302020-04-04T21:33:11+5:30
दाट लोकवस्तीच्या भागात व 'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात कोविड क्लिनिक सुरू
मुंबई- बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १० ठिकाणी 'करोना कोविड' तपासणी दवाखाने आजपासून कार्यान्वित झाले आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या व 'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात सुरू हे दवाखाने सुरु करण्यात आले आहेत सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांच्या कालावधी दरम्यान सुरू राहणार आहेत.
'कोरोना (कोविड १९) च्या अनुषंगाने आवश्यक ती प्राथमिक तपासणी स्थानिक स्तरावर करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १० ठिकाणी 'करोना कोविड' विषयक पडताळणी दवाखाने आजपासून सुरू करण्यात आले आहेत. हे दवाखाने प्रमुख्याने दाट लोकवस्तीच्या भागात व 'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात सुरू करण्यात आले आहेत.
या दवाखान्यांमध्ये एक डॉक्टर व एक नर्स यांचा समावेश असलेली चमू कार्यरत असेल. सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांच्या कालावधीत दरम्यान सुरू राहणाऱ्या दवाखान्यांमध्ये संशयितांच्या 'स्वॅब'चे नमुने घेण्यात येणार आहेत. हे नमुने आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
या दवाखान्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या 'स्वॅब' चे नमुने वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी आवश्यक ती परिवहन व्यवस्था करणे, त्याचबरोबर कर्मचारी नियोजन करणे; आदी बाबी संबंधित विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत