मुंबई - देशाला केवळ कोरोनापासूनच धोका नसून एक मोठं संकट भारतासमोर असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. कोरोनासोबतच तोंडासमोर असलेलं आर्थिक संकट हेही प्रचंड मोठं असून त्यासाठी आपल्याला तयार असणे गरजेचं आहे. कारण, आर्थिक संकटामुळे भारतीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असे राहुल गांधींनी म्हटले होते. राहुल गांधींच्या ट्विटला कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलंय. कोरोनामुळे देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. पण, हीच वेळ आपण सर्वांनी एकत्र येऊन संकटाचा सामना करण्याची असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक स्थितीचा उल्लेख करत मोदी सरकारला लक्ष्य केले होते. अंदमान निकोबारमध्ये त्सुनामी येण्यापूर्वी पाणी खाली गेले होते. अगदी तसंच आता सर्वकाही खाली गेलंय. लवकरच एक मोठा त्सुनामी येणार आहे, असे राहुल यांनी म्हटले होते. पुढे काय होईल, याबाबत सरकारला काहीच माहित नाही. मी पहिल्यापासूनच म्हणतोय, देशात आर्थिक त्सुनामी येणार आहे. मी सातत्याने याकडे लक्ष वेधत आहे, जाणीव करून देत आहे. मात्र, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारकडून मूर्ख बनविण्यात येत आहे. पुढे आर्थिक स्थिती अतिशय खराब होईल, असेही राहुल यांनी म्हटले होते. राहुल गांधीच्या आर्थिक टीकेला रोहित पवार यांनी सकारात्मकता दर्शवत, ही वेळ सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची असल्याचे म्हटलंय.
सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन कोरोना आणि देशातील आर्थिक स्थितीचा लढा स्विकारला पाहिजे. राहुल गांधीच्या मताशी मी सहमत आहेच, पण माझ्यामते एकत्र येऊन लढण्याची हीच ती वेळ असल्याचे रोहित यांनी म्हटलंय. आपण सर्वजण एकत्र आल्यास नक्कीच या समस्येला, अडचणीचा सामना करू शकू, असेही रोहित यांनी म्हटले आहे.