coronavirus: मुंबई सेंट्रल, परळ एसटी आगाराबाहेर लोकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:09 AM2020-05-12T06:09:54+5:302020-05-12T06:10:28+5:30
मुंबई सेंट्रल आगाराबाहेर सोमवारी सकाळी मूळ गावी जाण्यास इच्छुक असणारे अनेक जण सर्व कागदपत्रे घेऊन जमा झाले होते. परळ आगाराबाहेरही अशीच गर्दी होती.
मुंबई : लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारने ११ मेपासून एसटीच्या मोफत सेवेची घोषणा केली. त्यानुसार, सोमवारी राज्यातील विविध भागांत अडकलेले विद्यार्थी, मजूर, नागरिकांनी प्रत्येक एसटी आगाराबाहेर गर्दी केली. मुंबई सेंट्रल येथील आगाराबाहेरही प्रचंड गर्दी झाली होती. अखेर ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले.
मुंबई सेंट्रल आगाराबाहेर सोमवारी सकाळी मूळ गावी जाण्यास इच्छुक असणारे अनेक जण सर्व कागदपत्रे घेऊन जमा झाले होते. परळ आगाराबाहेरही अशीच गर्दी होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यानंतर, इतर राज्यांतील अडकलेल्या कामगार, मजुरांनाच त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यांत अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी एसटीची मोफत बस सेवा असेल, असा निर्णय प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता.
आॅनलाइन पोर्टल संथ
एसटी महामंडळाने आॅनलाइन पोर्टल तयार केले आहे. त्याद्वारे अर्जदार एकटा किंवा दोन ते तीन व्यक्तींचा छोटा गट असला, तरीही त्याची नोंद करणे सहज शक्य होणार आहे. मात्र हे पोर्टल संथगतीने सुरू आहे.