मुंबई : शासनाकड़ून परराज्यात प्रवासासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याने कामगारांनी अजार्साठी पोलीस ठाण्याबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कामगारांना वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक असल्याने, ते मिळविण्यासाठी त्यांची वणवण होताना दिसते आहे. यात कोरोनासंदर्भार्तील आदेशाचे उल्लंघन होत आहे.
मुंबईत अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबईतील परिमंडळ उपायुक्ताना नोडल अधिकारी बनविण्यात आहे. स्थलांतरीत मजूर, तिर्थयात्री, पर्यटक, विद्यार्थी यांना लॉकडाऊनच्या काळात प्रवास करणाऱ्यासाठी मुंबई पोलिसांकडून अर्ज तयार करण्यात आला आहे. यात नाव, आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह प्रवासाची माहिती तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यात कोरोना संबंधित कुठलीही लक्षणे नसावी, याबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित नोडल अधिकारी या अर्जाची तपासणी करत त्यांना प्रवासासाठी परवानगी देतील.
काळबादेवी भागातील एका झेरॉक्स दुकानदाराकड़ून ३० ते ५० रुपयात या अर्जाची विक्री करण्यात येत होती. त्यासाठीही मजूर मोठ्या संख्येने रांगेत उभे असताना दिसले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्यांना रोखले. पोलिसांनी दिलेल्या नमुन्यानुसार, अर्ज कसा असावा याचा नमुना पोलीस ठाण्यांबाहेर लावण्यात आला आहे. मात्र पोलीस ठाण्यातूनच अर्ज मिळत असला तरी अनेकांना अर्ज लिहिता येत नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे तो लिहिण्यासाठी ही मंडळी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आहेत. त्यामुळे या गर्दीत कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पोलिसालाही कोरोनाची बाधा होण्याची भिती भेडसावत आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण आणखीन वाढला आहे.मुलुंडमध्ये शाळेच्या मैदानाचा आधारकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुलुंडमध्ये कामगारांसाठी शाळेच्या मैदानात व्यवस्था करण्यात येणार आहे. यात स्वयंसेवकाच्या मदतीने त्यांना अर्ज भरण्यास मदत करण्यात येणार आहे. शिवाय तेथेच डॉक्टरांद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
खासगी क्लिनिककडून लूटकाही ठिकाणी खासगी क्लिनिकमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी २०० ते ३०० रुपये आकारण्यात येत असल्याचे प्रकारही काही भागात समोर आले. याबाबत पोलिसांनी शासकीय तसेच पालिका रुग्णालयातून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे कामगारानी रुग्णालयाबाहेर मोर्चा वळवला.