Coronavirus : आज जनता कर्फ्यू; मुंबईकरांचा संकल्प, संयम महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 02:04 AM2020-03-22T02:04:02+5:302020-03-22T06:56:57+5:30

Coronavirus : जागतिक साथीच्या आजाराला रोखण्यासाठी, या आजाराचे संक्रमण होऊ देणार नाही आणि इतरांनाही संक्रमित होण्यापासून वाचवू, असा निश्चिय मुंबईकरांनी केला आहे.

Coronavirus: Curfew today; Resolution of Mumbai, restraint is important | Coronavirus : आज जनता कर्फ्यू; मुंबईकरांचा संकल्प, संयम महत्त्वाचा

Coronavirus : आज जनता कर्फ्यू; मुंबईकरांचा संकल्प, संयम महत्त्वाचा

Next

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मुंबईकर रविवारी मुंबई लॉक डाउन करण्याकरिता सज्ज आहेत. परिणामी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत २४ तास धावत्या मुंबईचा वेग पूर्णत: ठप्प होईल. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरूराहतील. विशेषत: मुंबापुरीची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा या काळात सुरळीत सुरू राहणार असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक साथीच्या आजाराला रोखण्यासाठी, या आजाराचे संक्रमण होऊ देणार नाही आणि इतरांनाही संक्रमित होण्यापासून वाचवू, असा निश्चिय मुंबईकरांनी केला आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे पालन करणार असून या काळात मुंबईकर घराबाहेर पडणार नाहीत. रस्त्यांवर जाणार नाही. केवळ आवश्यक सेवांशी संबंधित लोकच घराबाहेर पडतील, असा निर्धार केल्याचे अनेक मुंबईकरांनी सांगितले. दरम्यान, दूध, खाद्य वस्तू, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. हे साहित्य साठवून ठेवण्यासाठी घाई, गर्दी करू नका, असेही आवाहन प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आले आहे.
कोरोनावर औषध उपलब्ध नाही तेव्हा आपण स्वत: निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी आणि स्वत: निरोगी राहण्यासाठी संयम अनिवार्य आहे. संयमाची पद्धत काय आहे तर गर्दीची ठिकाणे टाळणे, घरातून बाहेर निघणे टाळणे. सामाजिक अंतर पाळणे होय. मुंबईकरांचा संकल्प आणि संयम या आजाराचा प्रभाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे मतही मुंबईकरांनी व्यक्त केले.

एसटी धावणार
एसटी महामंडळाची बससेवा सुरू राहणार आहे. प्रत्येक आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार एसटी बस सोडणार आहे. किती फेऱ्या चालवाव्यात; हा निर्णय स्थानिक पातळीवर आगार प्रमुखांनी घ्यावा, अशा सूचना एसटी महामंडळाकडून प्रत्येक आगाराला देण्यात आल्या आहेत.

बसगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार
रविवारी मुंबईतील रेल्वे कामांसाठी ब्लॉक घेण्यात येतो. आजच्या रविवारीही रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, ऐन वेळी अडचणी येऊ नयेत, म्हणून मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे बेस्टच्या सर्व बसगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus: Curfew today; Resolution of Mumbai, restraint is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.