मुंबई : कोविड रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकर पुन्हा धास्तावले आहेत. परदेशातून येणाऱ्या काही नागरिकांमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग आढळून येत असल्यामुळे पुढील एक महिना कोविड संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यामुळे जम्बो कोविड केंद्रांबरोबरच कोरोना काळजी केंद्रेदेखील सुरु करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयांतील खाटा ताब्यात घेणे, ऑक्सिजन पुरवठा, मनुष्यबळ, औषध साठा तयार ठेवण्यात आला आहे. याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी विशेष बैठक घेऊन या सर्व तयारीचा आढावा घेतला.
मुंबईत ओमायक्राॅनचे ७४ रुग्ण आढळले असून, ३४ जणांना डिस्चार्जही मिळाला आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यामुळे ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे हाॅटेल, कोविड केंद्रे, शाळा, खासगी संस्था या ठिकाणच्या १२९ कोरोना काळजी केंद्रातील ३५ हजार २८ खाटा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तातडीने खातरजमा करून आवश्यक साठा उपलब्ध करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मास्क लावावाच लागणार...सार्वजनिक ठिकाणी बहुसंख्य नागरिक मास्क लावत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. पुढील महिनाभर कोविड रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक सर्व उपाययोजना सुरू आहेत. - सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)
रुग्णसंख्येत यामुळे वाढमुंबईतील सर्व निर्बंध १५ ऑगस्ट २०२१ नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. तसेच महिनाभरात सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक परदेशातून आले आहेत. यामध्ये ओमायक्रॉन संक्रमित देशातून आलेल्या पाहुण्यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. तर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ मोठ्या संख्येने सुरु असून यात कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे.