जमीर काझी
मुंबई : कोरोनापासून जनतेचे रक्षण करताना बळी पडलेल्या राज्यभरातील ५९ पोलिसांचे कुटुंबीय राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्यांना ५० लाखांची मदत जाहीर केली असली तरी प्रशासकीय प्रक्रियेत ती रेंगाळल्याने आतापर्यंत एकाही लाभार्थ्याला मदत मिळालेली नाही. पोलीस दलाकडून मात्र प्रत्येकी दहा लाख रुपये मिळाले आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्यभरातील पोलीस जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने ५९ पोलीस मृत्यूमुखी पडले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती. तीन महिन्यानंतर त्यांना छदामही मिळालेला नाही.
सर्वाधिक ३८ बळी मुंबईत
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांत २९ जूनपर्यंत राज्यात एकूण ५९ पोलीस मृत्यूमुखी पडले. त्यामध्ये सर्वाधिक ३८ जण मुंबईतील आहेत.
- पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १ अधिकारी २, जळगाव ग्रामीण, पालघर, जालना व उस्मानाबाद येथील प्रत्येकी १ अशा ५९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
लवकरच धनादेश देणारमदतीसाठी साडेचार कोटी शिल्लक होते. ते संबंधितांना देण्यात आले. अन्य निधी आरबीआय व बँकामध्ये जमा झाला. तो निधी मंगळवारपर्यंत कोषागार कार्यालयात वर्ग होईल. त्यानंतर कुटुंबीयांना धनादेश दिले जातील. - संजीव सिंघल, अप्पर महासंचालक, प्रशासन, पोलीस मुख्यालय