CoronaVirus : क्षयाच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू; कोरोनाचा पहिला अहवाल निगेटिव्ह, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 10:48 PM2020-04-25T22:48:37+5:302020-04-25T22:49:08+5:30
CoronaVirus : मुंबई महानगरपालिकेच्या क्षय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १८ मधील ७ चतुर्थश्रेणी कामगार, वॉर्ड क्रमांक १५ मधील १ चतुर्थश्रेणी कामगार तसेच ओ.पी.डी. मध्ये काम करणाऱ्या १ नर्स आणि १ डॉक्टर्स हे कोरोना बाधित झाले आहेत.
मुंबई : शिवडीच्या क्षय रुग्णालयात क्षय रोगाचा इतिहास असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाची लक्षण असल्याने त्याचे स्वॅब घेतले असता आधी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह व मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आली. मात्र तो पर्यंत या रुग्णाला हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. हा संसर्ग कुटुंबीयांनाही होऊ नये म्हणून घरी जाण्यास तयार नाहीत. दरम्यान, या रुग्णाची कोरोना चाचणी आधी निगेटीव्ह व नंतर पॉझिटीव्ह आल्याच्या घटनेला शिवडी टीबी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनीही दुजोरा दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या क्षय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १८ मधील ७ चतुर्थश्रेणी कामगार, वॉर्ड क्रमांक १५ मधील १ चतुर्थश्रेणी कामगार तसेच ओ.पी.डी. मध्ये काम करणाऱ्या १ नर्स आणि १ डॉक्टर्स हे कोरोना बाधित झाले आहेत. रुग्णाच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. या रुग्णाला सोमवारी वॉर्ड क्रमांक ११ मध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टर्स यांना या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने वॉर्ड नंबर १६ येथे बुधवारी हलविण्यात आले. रुग्णांवर उपचार सुरू असताना गुरुवारी निधन झाले.
रुग्णांच्या नातेवाइकांनी शववाहीनीतून शव न नेता रुग्णवाहीकेतून घेऊन गेले. टी. बी. रुग्णालयाच्या कामगारांनी पीपीइ किट न घालता रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहीकेत नेऊन दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनी पीपीइ किट घातले नाही. कारण कामगारांना हा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे माहीतच नव्हते. तर या रुग्णाचा अहवाल दुसऱ्या दिवशी पॉजिटिव्ह आल्याने कामगार, कर्मचारी परिचारिका यांच्यामध्ये मात्र प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
कोविड-१९ वार्ड नसतांना जर कोरोना रुग्ण असतील आणि सुरक्षेच्या दृष्टीने पीपीइ किट न वापरता रुग्णवाहीकेत नेऊन दिली यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले. कर्मचारी घरी जाणार नसून रुग्णालयातच राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
केवळ निकटच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईनची परवानगी
जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या निकषानुसार संशयितांमध्ये लक्षणे कर्मचाऱ्यांमध्ये दिसत नसल्याने त्यांना कॉरंटाईन करता येणार नाही. निकटच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईनची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पीपीइ किट व इतर उपलब्ध असल्याचे क्षय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी सांगितले.