मुंबई : कोरोना व्हायरसचा मोठा फटका आता बेस्ट उपक्रमाला बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये प्रवासी संख्येत थेट ३० टक्क्यांनी घट झाली आहे. बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात येत असल्याने प्रवासी संख्या येत्या काही दिवसांमध्ये आणखी कमी होणार आहे.बेस्ट उपक्रमाने भाडेकपात केल्यानंतर प्रवासी संख्या ३४ लाखांवर पोहोचली. नवीन मिनी वातानुकूलित बसगाड्या तर प्रवाशांमध्ये हिट ठरत आहेत. कोरोना व्हायरसचा धोका वाढल्यापासून वातानुकूलित बसगाड्यांचे प्रवासी कमी झाले आहेत. ३ मार्च रोजी बेस्ट बसमधून ३२ लाख ३० हजार ५०५ मुंबईकरांनी प्रवास केला. गेल्या चार दिवसांमध्ये प्रवासी संख्येत दररोज दोन लाखांनी घट होत आहे. गुरुवारी ही संख्या आणखी कमी होऊन २२ लाखांवर आली आहे. तब्बल ३० टक्के प्रवासी या आठवड्यात कमी झाल्याचे दिसून आले आहे.याचा मोठा फटका आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला बसू लागला आहे. जुलै, २०१९ मध्ये बेस्ट उपक्रमाने मोठी भाडेकपात केल्यानंतर उत्पन्नात घट होऊ लागली होती. कोरोनामुळे हा फरक आणखी वाढू लागला आहे. ३ मार्च रोजी दोन कोटी नऊ लाख २८ हजार उत्पन्न बेस्टच्या तिजोरीत जमा झाले होते. गेल्या चार दिवसांमध्ये प्रवासी संख्या ३० टक्क्यांनी घटल्यामुळे दररोजचे उत्पन्न सुमारे सव्वा कोटीवर आले आहे.बेस्ट बसने सरासरी १७ लाख प्रवासी प्रवास करीत होते. भाडेकपातीनंतर गेल्या सहा महिन्यांत प्रवासी संख्या ३२ लाखांवर पोहोचली होती. बेस्ट उपक्रमामार्फत दररोज सुमारे तीन हजार बसगाड्या रस्त्यांवर धावतात.घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो-१ मार्गावरील ६२ टक्के प्रवासी घटलेमुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो-१ मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या पाच दिवसांपासून घटत चालली असून, सध्या एकूण प्रवाशांच्या ६२ टक्के प्रवासी घटले असल्याची माहिती मेट्रो-१ प्रशासनाने दिली. मेट्रो-१ मार्गावर दररोज ४ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, आता कोरोनाचा धसका घेतल्यानंतर प्रवासी संख्या २ लाख ८० हजारांनी घटली असल्याचे मेट्रो-१च्या प्रवक्त्यांनी सांगितले.जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना राज्यात कोरोनाचे ५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असतानाच मुंबईतही एकूण अकरा रुग्ण आढळले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी कायदा लागू केला. यानंतर, हळूहळू मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्याही घटू लागली. विशेष म्हणजे याच आठवड्यात प्रवासी घटले असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले. मुंबईत मेट्रो सुरू झाल्यापासून साडेचार लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो-१ ने प्रवास करत आहेत. मात्र, कोरोना व्हायरस पसरू लागल्यानंतर सोमवारी मेट्रोचे २५ हजार प्रवासी कमी झाले. यानंतर, सरकारकडून जनतेला आवाहन करण्यात आल्यानंतर गुरुवारी मेट्रोचे २ लाख प्रवासी कमी झाले असून, शुक्रवारी हा आकडा अधिक वाढल्याचे मेट्रो-१च्या प्रवक्त्यांनी सांगितले.मुंबई लोकलनंतर मेट्रो-१ मार्गावर प्रवासी संख्या वाढू लागली आहे. मात्र, सरकारने जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर लोकलसेवा, बेस्ट बसच्याही प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे, तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी दिल्यामुळेही मेट्रोचे प्रवासी घटले असल्याचेही सांगण्यात आले.येत्या काही दिवसांत प्रवासी घटण्याच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
Coronavirus : कोरोनाचा धसका, बेस्ट प्रवाशांच्या संख्येत ३० टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 3:56 AM