Join us

CoronaVirus News: सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांमध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 1:52 AM

रुग्ण दुपटीचा काळ ६७ दिवसांवर; बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के

मुंबई : मुंबईत सप्टेंबर महिन्यात चाचण्यांची संख्या वाढल्याने नव्या रुग्णांची नोंद अधिक होताना दिसली, मात्र सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून आले. १ ते ६ सप्टेंबर या काळात मुंबईत १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर हळुहळू सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सध्या रुग्ण दुपटीचा काळ ६७ दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के आहे.मुंबईत २६ हजार ३८३ सक्रिय असून त्यातील ८ हजार ८८४ रुग्ण गंभीर आहेत. मुंबईत गंभीर रुग्णांचे प्रमाण सहा टक्क्यांच्या वर आहे. गंभीर रुग्णांची संख्या ८ हजार ८८४ इतकी असून त्यात १ हजार ४६७ अतिगंभीर आहेत. तर ५० वर्षांवरील रुग्णांची यात अधिक संख्या असल्याने अशा रुग्णांना घरगुती अलगीकरण न करता कोविड केंद्रामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांचा दर हा १८.३ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत ९ हजार १९९ रुग्ण दगावलेत. यात ५० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक असून ७ हजार ७९३ मृत्यू हे ५० वर्षांवरील आहेत. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी ५० वर्षांवरील रुग्णांची संख्या ही ९१ हजार ३६३ इतकी आहे. तर मृत्युदर हा ४.२४ इतका आहे. जुलैमध्ये दोन लाख चार हजार तर आॅगस्ट महिन्यात दोन लाख ३८ हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र सप्टेंबर महिन्यात महापालिकांनी चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्याने आता दररोज १३ ते १५ हजार चाचण्या होऊ लागल्या, त्यात जवळपास पाच हजार अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे दररोज दोन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत ११ लाख ६८ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ५२ टक्क्यांहून अधिक चाचण्या आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत.उपचारांच्या मुख्य प्रवाहापासून दूरकोविडची भीती, समाजाचा दबाव आणि यंत्रणांवरचा अविश्वास अशा काही कारणांमुळे अजूनही काही रुग्ण उपचारांच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे हे रुग्ण चाचण्या न करता घरच्या घरी उपचार वा फॅमिली डॉक्टरशी सल्लामसलत करुन उपचार घेत आहेत, परिणामी सरकारी यंत्रणांच्या आकडेवारीत हे रुग्ण येतच नसल्याने रुग्णसंख्येत तफावत दिसून येत आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या