coronavirus: राज्यात ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:05 AM2021-04-03T08:05:57+5:302021-04-03T08:06:35+5:30

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत अचानक चौपट वाढ झाली आहे. आणखी रुग्ण वाढले आणि ऑक्सिजन पुरवठ्याची अवस्था बिकट झाली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

coronavirus: The demand for oxygen in the state has quadrupled, the situation is critical if the number of coronaviruses increases | coronavirus: राज्यात ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास परिस्थिती गंभीर

coronavirus: राज्यात ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास परिस्थिती गंभीर

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत अचानक चौपट वाढ झाली आहे. आणखी रुग्ण वाढले आणि ऑक्सिजन पुरवठ्याची अवस्था बिकट झाली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रुग्णांना ऑक्सिजन प्राधान्याने द्या, असे राज्य सरकारचे आदेश काढल्यामुळे त्याचा परिणाम उद्योगांवर होत आहे तो वेगळाच. 

राज्यात दररोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यापैकी सामान्य परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी १५० ते २०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागतो पण कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे हीच मागणी दररोज ७०० मेट्रीक टनांपर्यंत वाढली आहे. गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढले होते त्यावेळी ही मागणी ६०० मेट्रीक टनांपर्यंत गेली होती. ती यावेळी आणखी वाढली आहे, असे सांगून जनआरोग्य योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की,  जर रुग्णसंख्या वाढली आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडू लागली तर परिस्थिती अडचणीची होऊ शकते.  

ऑक्सिजनअभावी कंपन्या येऊ शकतात अडचणीत
राज्यात ऑक्सिजन बनवणारे चार ते पाच प्रमुख उत्पादक आहेत, तर ५० च्या आसपास बॉटलिंग प्लँट आहेत. ते सगळे पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आपल्याकडे स्टील प्लँट, केमिकल कंपन्या, फोर्जिंग प्लँट अशा अनेक ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते. पण त्या ठिकाणी प्राधान्य न देता हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन देणे सुरू झाले आहे. त्यामुळे या कंपन्या अडचणीत येऊ शकतात. परिणामी या ठिकाणी काम करणारे कर्मचारीदेखील अडचणीत सापडतील, असेही मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे मत आहे.  

...तर परिस्थिती हाताबाहेर जाणार
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, जर लोक असेच बेशिस्तपणे विनामास्क फिरत राहिले आणि रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर सरकारला ऑक्सिजन मिळविणेदेखील महाकठीण होऊ शकते. राज्यात शेकडो रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाशिवायचे रुग्णदेखील आहेतच. त्यामुळे या अशा संकटकाळी जनतेने शिस्त पाळली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. 

भिलाई येथून मागविला ४०० मे. टन ऑक्सिजन
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील एक प्लँट तांत्रिक कारणासाठी बंद ठेवावा लागला तेथे औरंगाबाद किंवा अन्य कोठूनही ऑक्सिजन पाठवायचा असेल तर त्यात वेळ खूप जाणार होता. शेवटी सरकारने धावपळ करून मध्यप्रदेशातील भिलाई येथून ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली.

Read in English

Web Title: coronavirus: The demand for oxygen in the state has quadrupled, the situation is critical if the number of coronaviruses increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.