Coronavirus : आजूबाजूच्या नागरिकांनी टाकला सोसायटीवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 07:07 AM2020-03-17T07:07:19+5:302020-03-17T07:08:04+5:30
सोसायटीत राहणारे एक ज्येष्ठ नागरिक ६ मार्च रोजी दुबईवरून परतले. त्यांना दुस-या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी बोलवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेले असता रुग्णालयातील चाचणीत ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते.
- ओम्कार गावंड
मुंबई : मध्य मुंबईतील एका इमारतीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याने आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी त्या सोसायटीवर बहिष्कार टाकला. यामुळे सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सोसायटीत राहणारे एक ज्येष्ठ नागरिक ६ मार्च रोजी दुबईवरून परतले. त्यांना दुस-या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी बोलवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेले असता रुग्णालयातील चाचणीत ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच इमारतीत राहणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.
या सोसायटीच्या आजूबाजूस असणाºया सोसायटी व इमारतीमधील रहिवासी आपल्या घरी येणारा दूध विक्रेता, डिलिव्हरी बॉय, भाजी विक्रेता, घरकाम करणारी महिला यांना कोरोनाचे रुग्ण असलेल्या इमारतीत जाण्यास मज्जाव करीत आहेत. तुम्ही त्या इमारतीत जात असाल तर आमच्याकडे येऊ नका; अन्यथा आम्हालाही कोरोनाची लागण होईल, अशा प्रकारे भीती घालण्यात येत आहे.
इमारतीतील इतर सर्व कुटुंबांतील सदस्यांच्या तपासणीमध्ये टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेने संपूर्ण इमारतीचे व आजूबाजूच्या परिसराचे फवारणी व साफसफाई करून निर्जंतुकीकरण केले आहे. तरीदेखील मागील आठवड्यापासून इमारतीत घरकाम करणारी महिला अथवा विक्रेते फिरकले नाहीत. इमारतीतील रहिवाशांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असे इमारतीतील एका रहिवाशाने सांगितले.
टिळकनगर पोलिसांत तक्रार; सोशल मीडियावर अफवांना पेव
अनेकांनी इमारतीचे नाव व कोरोनाबाधित रुग्णाच्या नावासहित सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपद्वारे माहिती पसरविली. यामुळे टिळकनगर, चेंबूर व घाटकोपरमध्ये या सोसायटीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. याबद्दल टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रारदेखील नोंदविली आहे. पोलिसांचे व महानगरपालिकेचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. परंतु आसपासच्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य करण्याचे सोडून आमच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याने आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे, असे इमारतीतील रहिवासी डॉ. गणेश किणी यांनी सांगितले.