मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरच कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत इंटर्न, निवासी डॉक्टर, एसएमओ आणि इतर डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. आता सायन रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अधिष्ठातादेखील क्वारंटाइन झाले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या उपअधिष्ठात्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी उपअधिष्ठात्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून अधिष्ठाता कार्यालयातील दहा जणांना क्वारंटाइन करत त्यांची कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. रुग्णालयाचे अधिष्ठाताही तत्काळ क्वारंटाइन झाले आहेत. आपली तब्येत ठीक असून अद्याप आपल्याला लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत आपली कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
CoronaVirus News: सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 2:51 AM