मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्या वर पोहचली असून एकट्या मुंबईत कोरोना रुग्णाचा आकडा २ हजाराच्या आसपास आहे. मुंबईत कोरोना धोका वाढत असताना मुंबई महापालिकेने आयसीएमआरच्या निकषात बदल केल्याने कृत्रिमरित्या कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येईल पण प्रत्यक्षात कोविड १९ धोका वाढेल अशी भीती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवली आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) च्यावतीने कोरोना चाचणीबाबत वेळोवेळी स्पष्ट दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४ दिशानिर्देश जारी झाले असून त्यातील ९ एप्रिल २०२० च्या आदेशाचा उल्लेख त्यांनी केला. यामध्ये मुद्दा क्रमांक ५ मध्ये ज्या अतिजोखीम व्यक्तींमध्ये रोगाची लक्षण नाहीत परंतु तो कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आला आहे. अशांची संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते १४ दिवसापर्यंत एकदा तपासणी करण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे.
मात्र हा आदेश असताना मुंबई महापालिकेने १२ एप्रिल २०२० रोजी एक आदेश काढला आणि त्यात अतिजोखीमच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याची गरज नाही असं सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर आयसीएमआरचे आदेश पाळत असताना त्यात बदल करण्याची गरज नव्हती. त्यामुळे १२ एप्रिलचा मुंबई महापालिकेचा आदेश काढण्याची गरज नव्हती त्यानंतर १५ एप्रिल रोजी पुन्हा महापालिकेने आदेश काढला त्याने प्रचंड संभ्रमावस्था निर्माण करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे.
यात मुद्दा ४ मध्ये अतिजोखीम व्यक्तीला पाचव्या दिवशी निरीक्षण करुन म्हणजेच लक्षण दिसली तरच त्याची चाचणी करता येईल. चीनमध्ये कोरोनाच्या ४४ टक्के केसेसमध्ये लक्षण नसलेल्या व्यक्तींकडूनच संसर्ग दुसऱ्यांना झालेला आहे. केवळ भाषा बदलली असली तरी मुंबई महापालिकेच्या १२ एप्रिल २०२० च्या आदेशाचा अर्थ कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अतिजोखीमीच्या रोगाची लक्षणे नसलेल्या व्यक्तीची तपासणी होण्याची शक्यता दिसत नाही आणि ती केली नाही तर कुणाला जबाबदार सुद्धा धरता येणार नाही असं देवेंद्र फडणवीसांना निदर्शनास आणून दिलं.
त्यामुळे आगामी काही दिवसांत मुंबईतील रुग्ण सांख्यिकीदृष्ट्या कमी दिसण्यात यामुळे मदत मिळणार असली तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यास मात्र कोणतीही मदत होणार नाही. जे व्यक्ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांच्या संपर्कात आणि संसर्गातून नवीन लोक कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने आयसीएमआरच्या धर्तीवर स्वयंस्पष्ट दिशानिर्देश जारी करावेत अन्यथा कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमपणे कमी करण्याचा असा प्रयत्न लाखो लोकांच्या जीवनासाठी घातक ठरु शकतो अशी भीती व्यक्त करत मुंबई महापालिकेने रणनीती बदलण्याची निर्देश द्यावेत अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.