Join us

Coronavirus: देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 8:10 AM

या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकीकडे कोविडमुळे मृत्यू झाल्याची नोंद न झाल्याने मृतांचा आकडा कमी होतो तर दुसरीकडे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना नॉन कोविड रुग्ण म्हणून विल्हेवाट लावली जाते

ठळक मुद्देत्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना नॉन कोविड रुग्ण म्हणून विल्हेवाट लावली जातेरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तात्काळ त्याचा स्वॅब घेण्यात यावा अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत आहे.

मुंबई – राज्यात आणि देशात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांच्या वर पोहचली असून ६०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक ४ हजार ५०० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत तर २०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष भाजपा मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आकडेवारीत फरक असल्याचा आरोप करत आहेत.

याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही पुराव्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संभाव्य कोविड म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूची अन्य कारणे देऊन मृतदेह परस्पर सोपविल्याने मृत्यूसंख्या कमी दिसून कोरोनाचा धोका मात्र वाढत आहे असा आरोप केला आहे.

या पत्रात फडणवीसांना नमूद केले आहे की, संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतल्यानंतर काही जणांचा त्याठिकाणी मृत्यू होतो. अशा रुग्णांचा संभाव्य कोरोनाग्रस्त उल्लेख होतो. जवळपास १०० हून अधिक अशी प्रकरणं समोर आली आहे. संभाव्य कोविड १९ रुग्ण म्हणून त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्याचा तसेच स्वॅब घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु स्वॅब घेण्यात आला नाही. एका रुग्णाला ४ दिवस स्वॅब घेतला नाही त्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला त्यावेळी संभाव्य कोविड अशाप्रकारे नोंद करुन मृतदेह त्यांच्या घरच्यांना सोपावला जातो असं त्यांनी सांगितले आहे.

मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकीकडे कोविडमुळे मृत्यू झाल्याची नोंद न झाल्याने मृतांचा आकडा कमी होतो तर दुसरीकडे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना नॉन कोविड रुग्ण म्हणून विल्हेवाट लावली जाते. त्यांच्या घरच्यांची तपासणी केली जात नाही. त्यांना क्वारंटाईन केलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालावं. रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तात्काळ त्याचा स्वॅब घेण्यात यावा अशी सूचना आहे त्यामुळे याचं तंतोतंत पालन व्हावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

या पत्रासोबत देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाच्या पेशंटची कागदपत्रे जोडली आहेत. त्यात एक ४० वर्षीय रुग्ण १२ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला. सायंकाळी ७.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रेकॉर्डवर मृत्यूचे कारण कोविड संभाव्य असं लिहिण्यात आलं. त्या कागदपत्रावर रुग्णाला आयसोलेशन वार्ड आणि स्वॅब घेण्याची नोंद होती. प्रत्यक्षात मात्र तो स्वॅब घेण्यात आला नाही. पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर परस्पर मृतदेह कुटुंबाला देण्यात आला असं त्यांनी सांगितलं. एकट्या नायर रुग्णालयात आतापर्यंत ४४ रुग्ण अशाचप्रकारे स्वॅब न घेता कोरोना संभाव्य म्हणून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आले असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यादेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे