Join us

CoronaVirus: धारावीत कोरोनाबधितांचा आकडा १३वर; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 9:09 PM

धारावी, माहीम आणि दादर या परिसरातील दहा बाधित क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या संभाव्य रुग्णांसाठी शोधण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. 

मुंबई - धारावी झोपडपट्टीत गेल्या २४ तासांत सहा लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर, ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये आता रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली असून आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावी, माहीम आणि दादर या परिसरातील दहा बाधित क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या संभाव्य रुग्णांसाठी शोधण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. धारावीतील डॉ. बालिगा नगर सर्वाधिक बाधित ठरला आहे. या भागातील ५६ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर या परिसरात प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर येथे आरोग्य शिबिर सुरू करून कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेल्या लोकांची तातडीने चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान आतापर्यंत या परिसरातून आणखी तीन तर धारावीतील अन्य परिसरातून १२ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुकुंदनगर, वैभव अपार्टमेंट, मदिनानगर, धनवडा चाळ, मुस्लिम नगर, सोशल नगर आणि जनता सोसायटीचा समावेश आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने येथील आरोग्य शिबिरातून दररोज शेकडो नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत धारावीतील सहा रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये धारावी क्रॉस रोड येथील जनता सोसायटीमधील दाम्पत्य, मुस्लिम नगर येथील ५० वर्षीय महिला आणि धनवडा चाळीतील ३५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तर सोशल नगरमधील ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 

मुस्लिमनगरमधील ५० वर्षीय कोरोनाग्रस्त महिला पालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सफाईचे काम करते. धारावीतील बाधित क्षेत्रांमध्ये २३ मार्च ते ८ एप्रिल या काळात पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला प्रत्येकी एक आठवड्याचे रेशन असे नऊ हजर पाकीट पुरविण्यात आले आहे. तसेच बिगर शासकीय संस्थांच्या माध्यमातून ३० हजार २५० जेवणाचे सामान, १२२० किलो भाजी, २० हजार किंमतीची औषधे पुरविण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.

हे आहेत धारावीतील बाधित क्षेत्र..

डॉ. बालिगा नगर, जास्मिन मिल रोड, धारावी वैभव अपार्टमेंट, धारावी मेन रोड, शक्ती चाळ, मुकुंद नगर, धारावी मदिना नगर, धारावी जनता नगर, धारावी क्रॉस रोड, सोशल नगर, मुस्लिम नगर, धनवडा चाळ

कोरोनाग्रस्त रुग्ण...

 डॉ. बालिगा नगर - चार रुग्ण ( एकाचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू)

वैभव इमारत, धारावी मुख्य रस्ता...(३५ वर्षीय वैद्यकीय कर्मचाऱ्याला लागण)

मकुंद नगर झोपडपट्टी - दोन ( ४९ वर्षीय पुरुष आणि त्याचा २५ वर्षीय मुलगा)

मदिना नगर (२१ वर्षीय तरुण)

धन वडा चाळ (३५ वर्षीय तरुण)

मुस्लिम नगर (५० वर्षीय महिला, तिच्या संपर्कातील पाच लोकांना राजीव गांधी क्रीडा संकुल येथे अलग ठेवण्यात आले आहे)

सोशल नगर (६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू)

जनता सोसायटी (५९ वर्षांचा व्यक्ती व त्याची ४९ वर्षांची पत्नी)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस