मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यात जी उत्तर विभागातील दादर आणि धारावी परिसर यशस्वी ठरले आहेत. या दोन भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक अंकी असल्याचे दिसून येत आहे, तसेच आतापर्यंत तीन वेळा या भागांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही, तर माहीममध्येही केवळ ११६ सक्रिय असल्याने जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.
एप्रिल महिन्यात धारावीत पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर झपाट्याने येथील झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग वाढला. मात्र, चेस द व्हायरस, फिव्हर क्लिनिक, अशा अनेक उपक्रमांनी येथे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला. एवढेच नव्हे तर धारावी पॅटर्नचे अनुकरण जागतिक स्तरावर सुरू झाले, तर मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्यामुळे सतत वर्दळ असलेल्या दादरचाही आता शून्य स्कोअर आहे.धारावी परिसरात अवघे १४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. जी उत्तर विभाग कार्यालयाने विनामूल्य चाचणी केंद्र सुरू केल्याचाही नागरिकांना फायदा झाला.
दादरमध्ये फेरीवाले, दुकानदार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी या सर्वांची चाचणी केली जात आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात असून, सध्या ८४ सक्रिय रुग्ण आहेत.