- शेफाली परब-पंडित मुंबई : सकाळी दहाची वेळ.. सुजाताचा घसा खवखवतोय, तीन-चार दिवसांपासून तिला ताप येतो आहे. तिने आपली शंका दूर करण्यासाठी जी - उत्तर विभागातील वॉररूममध्ये फोन केला आणि त्याच दिवशी दुपारपर्यंत तिची कोविड चाचणी झाली. अँटिजन टेस्टमुळे तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे तत्काळ समजले आणि तिच्यावर उपचार सुरू झाले..मुंबईतील बहुतेक विभागात अशी यंत्रणा आता कार्यरत झाली आहे. पण सुजाता राहते तो परिसर म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी. दहा-बाय दहाची खोली, एका खोलीत आठ ते दहा माणसे, वापरायला सार्वजनिक शौचालय आणि स्वच्छतेचा अभाव.. धारावीतील हे भयाण वास्तव.. दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोनाने शिरकाव केल्याने संपूर्ण मुंबईला धोका निर्माण झाला होता. पण साडेआठ लाख लोकवस्ती असलेल्या याच ‘धारावी पॅटर्न’चा डंका आता जगात वाजत आहे. जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टमार्फत धारावीच्या लढ्याचा गौरव करण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्वी ‘हॉटस्पॉट’ असलेल्या या झोपडपट्टीत आज शंभरहून कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर ८५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले. आता बाधित रुग्णांची रोजची संख्याही दहापेक्षा कमी आहे. ही निव्वळ कागदी आकडेवारी आहे का? प्रत्यक्षातील धारावीचे चित्र काय? हे जाणून घेण्यासाठी घेतलेला हा आढावा... अशा होत्या अडचणी... अडीच चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमधील रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना नेहमीच करावा लागत असतो.रोगराई, अस्वच्छता, मूलभूत गरजांसाठी करावी लागणारी वणवण.. यामुळे जगण्यासाठी येथील रहिवाशांची रोजची झुंज सुरू असते. एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण या परिसरात सापडल्याने खळबळ उडाली. अरुंद रस्ते, एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या झोपड्या आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर हे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमुख कारण ठरले. येथे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे मोठे आव्हान होते.त्यात रोजंदारीवर जगणाऱ्या बहुतांश रहिवाशांसाठी आरोग्याची काळजी दुय्यम होती. हॉटस्पॉट ते जागतिक आदर्श.. कोरोनाविरोधात धारावीने दिलेल्या लढ्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे. मात्र धारावीकरांसाठी हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. महापालिका यंत्रणा, स्थानिक रहिवासी, सामाजिक संस्था यांची कसोटीच येथे लागली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संस्थात्मक विलगीकरण ही संकल्पना या विभागात राबविण्यात आली.मैदान, शाळा, सभागृह ताब्यात घेऊन संशयित व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले. ‘मिशन धारावी’ आणि ‘फिव्हर क्लिनिक’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची चाचणी सुरू करण्यात आली. यासाठी खासगी डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले. जास्तीत जास्त चाचण्या, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि त्वरित डिस्चार्ज ही मोहीम प्रभावी ठरली. येथील प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांनी बाहेर जाऊ नये, यासाठी त्यांना मोफत अन्नधान्य वाटप, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या गोळ्या देण्यात आल्या. योग्य उपचार मिळाल्यामुळे आतापर्यंत २२७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. लोकांमध्येही सतर्कता वाढल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही आता नियंत्रणात आले आहे. सध्या काय सुरू आहे?आरोग्याला दुय्यम स्थान देणाºया येथील रहिवाशांमध्ये आता जागरूकता पसरली आहे, हेच या मोहिमेचे मोठे यश आहे. ‘चेस द व्हायरस’ या मोहिमेच्या यशानंतर महापालिकेने जी उत्तर विभागातील नागरिकांसाठी दादर येथे मोफत चाचणी केंद्र सुरू केले आहे.मात्र गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत येथील बहुतांश लोकांची तपासणी झाली आहे. तसेच कोरोनाची लक्षणे याबाबत चांगली माहिती असल्यामुळे नागरिक आता स्वत:हून पालिकेच्या स्थानिक वॉररूममध्ये फोन करून मदत मागतात.अशा ३०-४० चाचण्या होत असतात. येथील खासगी डॉक्टर्सनीही महापालिकेच्या मोहिमेत सहभाग घेत सरकारी यंत्रणेवरील ताण थोडा हलका केला. 3000 धारावीत महापालिकेचे सफाई कामगार, अभियंते, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कार्यरत होते.50 कोरोनामुक्त झालेल्या येथील लोकांनी प्लाझ्मा दान करून बाधित रुग्णांना जीवनदान दिले आहे.धारावीत कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकही आता सतर्क झाले असल्याने कोरोनासारखी लक्षणे आढळल्यास ते तत्काळ महापालिकेशी संपर्क साधतात. धारावीबरोबरच दादर, माहीम या जी उत्तर विभागातील अन्य भागांसाठी मोफत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संशयित रुग्ण आपली चाचणी लगेच करून घेतात..- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभागधारावीने कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी केला. याचे श्रेय महापालिका एवढेच स्थानिक चाळ कमिटी, बिगरशासकीय संस्था यांनाही द्यावे लागेल. येथील काही युवक स्वयंस्फूर्तीने मदतकार्य करीत होते. जागरूकता वाढल्यामुळे लोक स्वत: जाऊन तपासणी करून घेतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार येथे नियंत्रणात आहे.- राजेंद्र कोरडे, अध्यक्ष, धारावी पुनर्विकास समितीधारावीसमोरील सध्याच्या अडचणी... धारावीत मोठ्या प्रमाणात लघु उद्योग चालतात. यावर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव येथे वाढल्यानंतर येथील ८० टक्के कामगार त्यांच्या मूळगावी परतला आहे. त्यामुळे येथील उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटातून बचावले, तरी येथील लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असले तरी प्रत्यक्षात दिवाळीनंतरच सर्व कारभार सुरळीत होऊन लोकांना पेमेंट मिळू लागेल.- कल्पेश महेंद्र शाह, धारावीतील लघु उद्योजकडीआरपी गो बॅक‘सेक्टर १ धारावी प्रकल्पातून वगळून पुनर्विकास करा’मुंबई : सोळा वर्षांपासून धारावी सेक्टर १ चा पुनर्विकास रखडला आहे. केवळ निविदा प्रक्रियेचा खेळ मांडण्यात येत आहे. रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे धारावी प्रकल्पातून सेक्टर १ वगळून त्याचा पुनर्विकास म्हाडामार्फत राबविण्यात यावा, अशी मागणी रविवारी डीआरपी सेक्टर १ रहिवासी संघर्ष समितीने डॉ. आंबेडकर चौक, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये केली.धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी)चा शासन निर्णय ४ फेब्रुवारी २००४ रोजी जारी करण्यात आला. त्यास आजमितीस १६ वर्षे उलटून गेली. शासनाने सल्लागार नेमले. संस्थांच्या वतीने झोपडीधारकांचे सर्वेक्षण केले. जागतिक स्तरावर निविदा काढल्या. सेक्टरची पुनर्रचना केली. यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. शासनाने या प्रकल्पाकरिता कंपनी स्थापन केली. रेल्वेची जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढली. दोन बड्या विकासकांनी स्पर्धात्मकरीत्या लावलेल्या बोलीस सेकलिंक कंपनीची निविदा सरस ठरली. पण पेच निर्माण झाला. मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे.शासनाने पूर्वीचा सेक्टर १ जाहीर केलेला माटुंगा लेबर कॅम्प, शाहूनगर, गीतांजली नगर आणि पीएमजीपी वसाहत या चाळी आणि इमारतींना या प्रकल्पातून वगळण्यात यावे. बीडीडी चाळीच्या धर्तीवर म्हाडामार्फत सेक्टर १ चा पुनर्विकास करावा, इमारती, चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर द्यावे, झोपडीतील रहिवाशांना ४०० चौरस फुटांचे घर द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत, असे सुनील कांबळे, अनिल साळवे, प्रफुल राजगुरू, कॉ. सेलवन यांनी संगितले.
CoronaVirus News: कोरोना हॉटस्पॉट ते जागतिक आदर्श; धारावी पॅटर्नचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 1:55 AM