Coronavirus: धारावीकरांना वाटते लॉकडाऊनची भीती; पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:29 AM2021-03-24T01:29:45+5:302021-03-24T01:30:07+5:30
ज्या धारावीने एकेकाळी रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविले होते तेथे आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येथील नागरिकांना नियम आणि अटी मध्ये लसीकरण करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने लसीकरण हाती घेतले आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता धारावीतही रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. येथील रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा कंबर कसली असून धारावीत तपासणीवर जोर देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त आता येथे लसीकरणही हाती घेण्यात आले असून रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी काम केले जात आहे, असा दावा मुंबई महापालिकेने केला. दुसरीकडे धारावीत पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधा तुलनेने तोकड्या आहेत. परिणामी रुग्णवाढीचा धोका असाच कायम राहिला तर येथे लॉकडाऊन लागेल की काय? अशी भीती धारावीवासीयांना आहे.
ज्या धारावीने एकेकाळी रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविले होते तेथे आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येथील नागरिकांना नियम आणि अटी मध्ये लसीकरण करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने लसीकरण हाती घेतले आहे. मात्र एवढ्याने रुग्ण संख्या आटोक्यात येणार नाही, असे येथील माजी आमदार बाबूराव माने यांचे म्हणणे आहे. मुळात हा परिसर खूप मोठा आहे. येथे सातत्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे आहे. मुळात आपल्याकडे आजाराबाबत अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा असतात. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा म्हणजे धारावीत आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केला पाहिजे. या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे. ज्याप्रमाणे सुरुवातीला काम झाले त्याप्रमाणे आता काम करणे गरजेचे आहे. येथील लोकसंख्येचा आकडा तब्बल बारा लाख आहे. येथे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. अनेक कामगार येथे मोठ्या संख्येने राहतात. परिणामी पहिल्यांदा प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेऊन लोकांना त्रिसूत्री राबविण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. हात धुणे, मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे याचा अवलंब केला पाहिजे.
काय म्हणतात रहिवासी?
मुंबई महापालिकेने तपासण्या आणि लसीकरणाचा कार्यक्रम सुरू ठेवावा. मात्र हे करताना येथील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचेल यासाठी जोमाने काम करावे, असे धारावीवासीयांचे म्हणणे आहे. येथील लोकसंख्या बारा लाख असल्याने लसीकरण केंद्रांची संख्याही मोठी असली पाहिजे. किमान सहा लसीकरण केंद्रे असली पाहिजेत. प्रबोधन केंद्रे सुरू केली पाहिजेत. येथे पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक उद्योग आहेत. येथे मोठ्या संख्येने कामगार वास्तव्य करत आहेत. आपल्या मूळ गावी गेलेले कामगार आता पुन्हा एकदा पोटापाण्यासाठी येथे आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत येथील जागरुक नागरिकांनी मांडले.