coronavirus : मुंबईत ३५७ कोरोना रुग्णांचे निदान एकूण रुग्णसंख्या ४ हजार ४४७
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:52 PM2020-04-24T22:52:16+5:302020-04-24T22:54:37+5:30
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ४४७ तर मृतांची संख्या १७८ झाली आहे. पालिकेच्या अहवालानुसार, शहर उपनगरात कोरोनाच्या ३ हजार ८१५ अॅक्टीव्ह केसेस असल्याची नोंद आहे.
मुंबई – मुंबईची कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा सुविधांचा विस्तार कऱण्याचे कामही वेगाने सुरु झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात शहर उपनगरात ३५७ कोरोना (कोविड-१) रुग्णांचे निदान झाले आहे, तर ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ४४७ तर मृतांची संख्या १७८ झाली आहे. पालिकेच्या अहवालानुसार, शहर उपनगरात कोरोनाच्या ३ हजार ८१५ अॅक्टीव्ह केसेस असल्याची नोंद आहे.
मुंबईत २१ व २२ एप्रिल रोजी विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या १६८ कोविड चाचणी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले, त्यांचा अतंर्भाव अहवालात केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. शहर उपनगरात एकूण कोरोना रुग्णांपैकी १ हजार ७९५ कोरोना रुग्ण सर्वेक्षणांतर्गत सापडले आहेत. तर रुग्णांचा शोध घेण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या १८४ कोविड क्लिनिक्समध्ये ७ हजार २०३ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी २ हजार ४९४ संशयितांचे नमुने घेण्यात आले.
मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या ११ मृत्यूंपैकी सात जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ७ पुरुष व चार महिलांचा समावेश होता. राज्यात नोंद झालेल्या १८ मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. यात ६० हून अधिक वय असलेले ९ रुग्ण आहेत. तर ६ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तीन रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ६७ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आझार आहेत. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून शुक्रवारी एकूण ७७०२ सर्वेक्षण पथकांनी २८.८८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार १८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आजपर्यंत ९५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ जण घरगुती अलगीकऱणात असून ८ हजार ८१४ लोक संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.