- यदु जोशीमुंबई : कोरोनाच्या सावटाखाली काही डॉक्टरांनी दवाखाने बंद करणे, दवाखान्यांच्या वेळा कमी करणे किंवा आठवड्यातून एक-दोन दिवस रुग्णसेवेसाठी खेडोपाडी जाणे बंद करणे, कर्मचाऱ्यांअभावी डॉक्टरांची हॉस्पिटल चालवण्याबाबत असमर्थता अथवा संचारबंदीत रुग्णांनाच डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यात येणाºया अडचणी, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून आता डॉक्टरांना टेलिफोनिक सल्ला आणि डिजिटल प्रिस्क्रिप्शनची परवानगी देण्यात आली आहे.महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता आपल्या मोबाईलवरून डॉक्टरांना कॉल/व्हिडिओ कॉल करून कुठली लक्षणे आहेत ते सांगायचे. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतील आणि त्याचा फोटो रुग्णाला व्हॉटस्अॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवतील. तो दाखवून रुग्ण व त्यांच्या आप्तांना दुकानांमधून औषधी घेता येईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी देशभरातील आरोग्यमंत्री आणि अन्न व औषधी प्रशासनमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तीत डिजिटल प्रिस्क्रिप्शनबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. एक-दोन दिवसांत याबाबतचे आदेश निश्चित काढले जातील, असे आश्वासन हर्षवर्धन यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वतोपरी उपायोजना करीत असताना इतर रुग्णांची हेळसांड होऊ नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच डिजिटल प्रिस्क्रिप्शनचा पर्याय देण्यात आला आहे. कौन्सिलने याबाबत आधीच पुढाकार घेतला आहे. याबाबत केंद्राच्या दिशानिर्देशांचे पालनदेखील केले जाईल.कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर जाण्यापासून नातेवाईकच रोखतातइंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद केल्याचा त्यांनी स्पष्टपणे इन्कार केला. ते म्हणाले की, दवाखाने हॉस्पिटल्समधील बरेचसे कर्मचारी कामावर येत नाहीत.या कर्मचाºयांना ड्यूटीवर जाण्यापासून त्यांचे नातेवाईकच रोखतात. तरीही ते आलेच तर वाटेत पोलीस मारहाण करतात. इच्छा असूनही कर्मचाºयांअभावी हॉस्पिटल चालवणे कठीण होऊन बसले आहे.
CoronaVirus : राज्यात इतर रुग्णांवर डिजिटल प्रिस्क्रिप्शनने उपचार!
By यदू जोशी | Published: March 27, 2020 2:24 AM