Join us

Coronavirus : 'राज्यातील ३ कोटी केशरी कार्डधारांना रेशन दुकानातून स्वस्त दराने धान्यवाटप सुरु'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 10:52 AM

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा रेशनकार्ड धारकांची संख्या १ कोटी ६० लाख आहे.  त्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्याचे वितरण केले जाते.

मुंबई - राज्यातील  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापर्यंत १ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर, केशरी कार्डधारकांनाही धान्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानातून या लाभार्थींना गहू आणि तांदूळ कमी दराने देण्यात येत आहे. कोरोना लॉकडाऊन कालावधीत गरिब व गरजू नागरिकांसाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याची, अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा रेशनकार्ड धारकांची संख्या १ कोटी ६० लाख आहे.  त्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्याचे वितरण केले जाते. या योजनेमधून सुमारे २० लाख १२ हजार ५३३ क्विंटल गहू, १५ लाख ५४ हजार ६०४ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ९२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख २४ हजार ७९३ शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. याअंतर्गत त्यांना राहत्या ठिकाणीच अन्नधान्य पुरवण्यात येते. तर, आता राज्यातील केशरी कार्डधारका नागरिकांनाही धान्य देण्यास सुरुवात झाल्याची माहिती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दिली. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी २३ लाख १३ हजार ६३४ रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. या रेशनकार्डवरील ५ कोटी ५९ लाख ५७ हजार ४२५ लोकसंख्येला २७ लाख ९७ हजार ८७० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. आता, महाराष्ट्र सरकारने मे व जून महिन्यासाठी ३ कोटी केशरी रेशनकार्ड धारकांना ३ किलो गहू ₹ ८ प्रतिकिलो व २ किलो तांदूळ ₹ १२ प्रतिकिलो दराने वितरित करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे साडेचार लाख मेट्रिक टन गहू व तांदूळाचे वितरण करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे, केसरी कार्डधारकांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन या धान्यवाटप योजनेचा लाभ घ्यावा. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअन्नमुख्यमंत्री