मुंबई - पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्त रुग्णांचा आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच, लोकांपर्यंत योग्य तो मेसेज पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांनी घाबरू नये, योग्य ती काळजी घ्वावी, असे आवाहनही पवार यांनी केलंय.
''माझी तमाम नागरिकांना आग्रहाची विनंती आहे, घाबरू नका, पण काळजी सगळ्यांनीच घ्या. हात धुणं, मास्क वापरणं, दूरवरुन बोलणं, खोकला आल्यानंतर रुमाल वापरा. काळजी घ्या, असे म्हणत अजित पवार यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केलंय. तसेच, स्वत:चं डोकं लावून औषधं घेऊ नका, असं काळजीपूर्वक आवाहनही त्यांनी केलंय. शंका वाटल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलय. तर, कॅबिनेटमध्ये कोरोनाबाबत चर्चा होणारच आहे, तमाम जनेतनं काळजी घेण्याची गरज आहे, असेही पवार यांनी म्हटले.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी रात्री केली. त्यानंतर, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेऊन याबाबत माहिती दिली.
कुणीही घाबरण्याचे कारण नसून योग्य ती खरबदारी घेण्याचं आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केलं आहे. तसेच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनासंदर्भात योग्य प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले. कोरोनासंदर्भात अनेक अफवा पसरल्या आहेत. पण, चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही, असे स्वत: अजित पवार यांनी सांगितले. तसेच, कोरोनासंदर्भात सरकारकडून एक मेसेज देण्यात आला आहे, तो जास्तीत जास्त लोकांच्या मोबाईलवर पोहोचला पाहिजे. आपण, तो मेसेज व्हायरला करावा. त्यामुळे, कोरोनासंदर्भातील अफवा दूर होतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.