CoronaVirus : सर्दी, ताप-खोकल्याची औषधे देऊ नका; औषध विक्रेत्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 09:03 PM2020-04-26T21:03:07+5:302020-04-26T21:04:01+5:30
CoronaVirus : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाविरोधातील लढाई दिवसेंदिवस अवघड होत आहे.
मुंबई - सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची मुख्य लक्षणे आहेत. काहीवेळा अशी लक्षणे असलेले रुग्ण जवळच्या औषध दुकानात जाऊन यावरील औषधे घेण्याची शक्यता आहे. यामुळे कॊरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे औषध विक्रेते- फार्मासिस्टनी ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीवरील औषधे अजिबात विकू नये. जर या औषधांची मागणी कोणी केली तर त्याची माहिती त्वरित मुंबई महानगर पालिकेला द्यावी वा त्यांना नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये पाठवावे, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) औषध विक्रेते-फार्मासिस्टला केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाविरोधातील लढाई दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यात अनेक जण भीतीने वा कॊरोनाग्रस्तांकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन असल्याने लक्षणे लपवणाऱ्यांची संख्याही खूप आहे. अशी लक्षणे असली तर कोरोना असेलच असेही नाही. पण अशी लक्षणे असणाऱ्यांना शोधून काढत कोरोनाचा धोका कमी करणे याकडे महापालिकेचा कल आहे.
रुग्ण जर मेडिकलमधून औषधे घेऊन गेली तर त्यांचा धोका वाढेलच, पण इतरांना ही धोका निर्माण होईल. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यावरील औषधे न देता, औषधे मागणाऱ्यांची माहिती पालिकेला कळवावी असे आवाहन औषध विक्रेत्यांना करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष आणि आयएमएचे पदाधिकारी डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे. तर सर्व औषध विक्रते-फार्मासिस्ट या सुचनेचे पालन करत आहेत. कोणतीही ठराविक औषधही दिली जात नाहीत. अशी औषधे मागणाऱ्यांना फ्ल्यू क्लिनिकमध्ये पाठवत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिली आहे. या लढ्यात आमची भूमिका योग्य प्रकारे निभावू असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे.